नागपूर,
perspective-photography-exhibition : गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन, नागपूर येथे आयोजित ‘ पर्स्पेक्टिव्ह छायाचित्र प्रदर्शन २०२६’’ चे भव्य उद्घाटन मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. मणाली मकरंद क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे अधिष्ठाता म्हणून प्रमुख उपस्थित होते. तसेच अप्लाइड आर्ट विभागप्रमुख प्रा. अविनाश घरडे, ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग विभागप्रमुख प्रा. संजय जाठार आणि एटीडी विभागप्रमुख प्रा. प्रफुल्ल नायसे यांची विशेष उपस्थिती लाभली. उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्रदर्शनाचे प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपयोजित कला आणि छायाचित्रण विभाग यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे कुशल क्युरेशन प्रा. मनीष राऊत यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेली छायाचित्रे केवळ सौंदर्यदृष्टीपुरती मर्यादित न राहता, प्रत्येक छायाचित्रातून वेगळी कथा, भावना आणि सामाजिक भान व्यक्त करताना दिसते. एका क्षणात दडलेले अर्थ, वास्तवाचे विविध पैलू आणि नवनवीन दृष्टिकोन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. फोटोग्राफी विभागातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनासाठी घेतलेले परिश्रम, त्यांची कल्पकता आणि सर्जनशील मांडणी पाहून उपस्थित मान्यवरांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. विद्यार्थ्यांच्या कलात्मक दृष्टीकोनाला असे व्यासपीठ मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दुपारी १२ वाजल्यापासून आर्ट गॅलरीत सुरू असलेले हे प्रदर्शन कला रसिकांसाठी एक वेगळा, समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव ठरत असून, नागपूरकर कला प्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक १३ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी १० ते सायं. ५:३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.