डॉ. श्रीकांत पर्बत हे अभाविप विदर्भचे नवनिर्वाचित प्रांत अध्यक्ष

06 Jan 2026 19:27:05
नागपूर, 
shrikant-parbat-devashish-gotarkar : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विदर्भ प्रांताच्या २०२५–२०२६ सत्रासाठी नेतृत्व जाहीर करण्यात आले असून, डॉ. श्रीकांत रामराव पर्बत यांची विदर्भ प्रांत अध्यक्षपदी पुनर्निर्वाचन तर देवाशिष चंदा मिलिंद गोतरकर यांची विदर्भ प्रांत मंत्रीपदी नव्याने निवड करण्यात आली आहे. अभाविप विदर्भ प्रांत कार्यालयातून मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी निर्वाचन अधिकारी प्रा. योगेश येणारकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असून, ९ जानेवारी रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या ५४ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनात ते आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत.
 
 
 
abvp
 
 
डॉ. श्रीकांत पर्बत हे मूळचे यवतमाळ येथील रहिवासी असून शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात एम.एस्सी, शिक्षणशास्त्रात एम.एड., एम.फिल., शालेय व्यवस्थापनातील पदविका तसेच शिक्षण विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांच्या दहा संशोधन पत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. सध्या ते यवतमाळ येथील अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. नगर ते प्रांत स्तरावरील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांची विदर्भ प्रांत अध्यक्षपदी पुनर्निवड झाली आहे.
 
 
देवाशिष गोतरकर हे मूळचे अकोला येथील असून त्यांनी प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्वशास्त्र या विषयात शिक्षण घेतले आहे. २०२० पासून अभाविपशी संपर्कात असलेले गोतरकर २०२२ पासून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालय अध्यक्ष ते विदर्भ प्रांत कार्यालय मंत्रीपर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सध्या ते नागपूर महानगर संघटनमंत्री म्हणून कार्यरत असून, आता त्यांची विदर्भ प्रांत मंत्रीपदी निवड झाली आहे.
Powered By Sangraha 9.0