नवी दिल्ली,
Sonia Gandhi admitted to hospital दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाचा फटका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पुन्हा बसला असून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना राजधानीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्या रुग्णालयात आल्या असून सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. रुग्णालय सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी नियमित आरोग्य तपासणीसाठी आल्या होत्या, मात्र तपासणीदरम्यान त्यांना छातीत दुखणे, तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास अडचण जाणवत असल्याचे लक्षात आले.
रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की तपासणीत त्यांच्या दम्याचा त्रास किंचित वाढल्याचे दिसून आले आहे. हिवाळ्यातील हवामान आणि दिल्लीतील उच्च प्रदूषण पातळी यामुळे हा त्रास वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून आवश्यक औषधोपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
७९ वर्षीय सोनिया गांधी यांना याआधीही प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आल्या आहेत. २०२० मध्येही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिल्लीतील खराब हवेपासून दूर राहण्यासाठी त्या काही काळ गोव्यात वास्तव्यास गेल्या होत्या. त्या वेळीही श्वसनाशी संबंधित त्रास वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. डॉक्टरांच्या मते, प्रदूषणामुळे त्यांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.