आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश !

06 Jan 2026 21:49:21
आर्वी,
sumit-wankhede : आ. सुमित वानखेडे यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश आले आहे. अवकाळी पाऊसामुळे संत्रा पिकाचे जे अतोनात नुकसान झाले होते, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ कोटी ३८ लाख ९१ हजार ३०० रुपयांचे विशेष मदत पॅकेज आज शासन निर्णयाद्वारे अधिकृतपणे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील ८,९९९ शेतकऱ्यांना थेट मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसापूर्वी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आ. सुमित वानखेडे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सभागृहात अत्यंत आक्रमकपणे मांडली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे मृग बहार गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची भरपाई 'विशेष बाब' म्हणून मिळावी, यासाठी आ. सुमित वानखेडे यांनी सरकारकडे विशेष आग्रही मागणी केली होती. त्यांच्या याच 'बुलंद आवाजामुळे' मंत्रिमंडळाने ११ डिसेंबर २०२५ रोजी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आणि आज त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
 

kl 
 
या शासन निर्णयानुसार, वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागातील आर्वी, कारंजा आणि आष्टी या तीन तालुक्यातील ३१५ गावांमधील एकूण ५,५०६ हेक्टर बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मदतीची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय 'डीबीटी' द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचे चीज व्हावे, या उद्देशाने आ. सुमित वानखेडे यांनी प्रशासकीय पातळीवर जो पाठपुरावा केला, त्याचे आज सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
आ. सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या निधीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण अट घातली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी मिळालेली ही मदत बँकांनी शेतकऱ्यांच्या जुन्या कर्ज खात्यात वळती करू नये किंवा त्यातून कर्ज वसुली करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बँकांना देण्यात आल्या आहेत. संत्रा बागायतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आ. सुमित वानखेडे यांचे आभार मानले आहेत.
Powered By Sangraha 9.0