वर्धा,
sunil-gawande : पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणादरम्यान गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात वर्धा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गावंडे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. प्रशिक्षण काळात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२९ ते ३१ डिसेंबर दरम्यान पुण्यातील यशदा येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी वर्धा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गावंडे उपस्थित होते. मात्र, ३० डिसेंबर रोजी गावंडे यांनी मद्यधूंद अवस्थेत प्रशिक्षणस्थळी मोठा गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत यशदा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत गावंडे यांना प्रशिक्षणातून मुत केले. ही घटना शासकीय शिस्त, सभ्यता तसेच आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे नमूद करत यशदाचे महासंचालक यांनी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना पत्र पाठवले. संबंधित अधिकार्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देत, करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या पत्रानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ पावले उचलत विस्तार अधिकारी सुनील गावंडे यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. दोन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. आता गावंडे यांनी सादर केलेल्या उत्तरावर जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणात पुढील कठोर कारवाई होण्याची शयता व्यत केली जात आहे.