झाँसी,
female auto driver murdered उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. झांसीची पहिली महिला ऑटो चालक म्हणून ओळख निर्माण केलेल्या अनीता चौधरी यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुरुवातीला हा मृत्यू अपघात असल्याचे मानले जात होते, मात्र शवविच्छेदन अहवालातून खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालपुरा परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय अनीता चौधरी यांचा मृतदेह रविवारी रात्री स्टेशन रोडवर आढळून आला होता. त्यांच्या जवळच ऑटो रिक्षा उलटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पोलिसांनी सुरुवातीला अपघाताचा अंदाज व्यक्त केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मात्र सायंकाळी आलेल्या अहवालात अनीता यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आणि पोलीस तत्काळ सतर्क झाले.
या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांविरोधात हत्या गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी मुकेश झा याच्यावर पोलिसांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. अनीताचे पती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुकेश झा, त्याचा मुलगा शिवम आणि नातेवाईक मनोज झा यांच्यावर हत्या केल्याचा आरोप आहे. शिवम आणि मनोज यांना अटक करण्यात आली असून मुकेश झा फरार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनीता आणि मुख्य आरोपी मुकेश झा यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख होती. काही काळ ते एकत्र राहत होते, मात्र नंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाले.female auto driver murdered अनीताच्या बहिणीने असा आरोप केला आहे की, मुकेश झा गेल्या अनेक दिवसांपासून अनीताला मानसिक त्रास देत होता आणि तिला धमकावत होता.
अनीता चौधरी यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी कर्ज काढून ऑटो रिक्षा घेतली होती. दिवस-रात्र मेहनत करून त्या कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. त्यांच्या जिद्दीची आणि धाडसाची दखल घेत तत्कालीन डीआयजी जोगेंद्र कुमार यांनी त्यांचा सन्मानही केला होता. मात्र आज त्याच संघर्षशील महिलेचा असा अंत झाल्याने झांसीसह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.