रामनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

06 Jan 2026 21:42:00
वर्धा, 
fake-construction-worker-certificate-case : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर रामनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कामगार अधिकारी कार्यालयातील निरीक्षक रीना पोरेटे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
 
 
k
 
मिळालेल्या माहितीनुसार, इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणासाठी अर्जांची तपासणी सुरू असताना मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. बांधकाम कामगार नोंदणीसाठी किमान ९० दिवसांचे काम केले असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. देवळी तालुयातील घोडेगाव येथील सुनील महादेव उपासे (३४) याने ठेकेदार विनोद बबन राऊत (४१) रा. खातखेडा यांच्या नोंदणी क्रमांकाच्या प्रमाणपत्राच्या आधारे १ ऑगस्ट २०२० ते १ नोव्हेंबर २०२० या कालावधीसाठी १ सप्टेंबर २०१८ रोजी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली होती. घोडेगाव येथील दिवाकर कृष्णा कोल्हे (४५) याचे नूतनीकरण १ मे २०२१ ते २ ऑगस्ट २०२१ या कालावधीसाठी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते.
 
 
तसेच बोरगाव मेघे येथील रोहिणी मिलिंद ब्राह्मणकर (२८) हिची नोंदणी ठेकेदार मिलिंद ब्राह्मणकर (६१) रा. बोरगाव मेघे यांच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे करण्यात आली होती. या सर्व प्रकरणांची प्राथमिक चौकशी केली असता, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवा शर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत सादर करण्यात आलेली नोंदणी प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी शासनाची फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे कामगार नोंदणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात निरीक्षक रीना पोरेटे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी ५ जानेवारी रोजी विनोद राऊत, दिवाकर कोल्हे व मिलिंद ब्राह्मणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0