वाशीम,
brijesh-patil : बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून, तिचे दुष्परिणाम मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि सर्वांगीण विकासावर होतात. त्यामुळे विवाह मंडप चालक, मंगल कार्यालय व्यवस्थापक, पुरोहित, धर्मगुरू, केटरर्स,फोटोग्राफर आदी सेवा पुरवठादारांनी विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासणे आवश्यक आहे. संशयास्पद प्रकरणे आढळल्यास तत्काळ संबंधित यंत्रणांना कळवावे, असे स्पष्ट निर्देश अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विवाह प्रसंगी विविध सेवा पुरविणार्या यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, सेवा पुरवठादार आणि समाज यांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील तरतुदी, दंडात्मक कारवाई तसेच तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीस परिविक्षाधीन अधिकारी गणेश ठाकरे उपस्थित होते. त्यांनी प्रशासन आणि समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने भूमिका बजावल्यासच बालविवाह पूर्णतः रोखता येईल, असे मत व्यक्त केले. बैठकीच्या शेवटी उपस्थित सेवा पुरवठादारांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमामुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती व समन्वय अधिक बळकट होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.