ढाणकी नगरपंचायतला सत्ता कोणाची

06 Jan 2026 18:35:07
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
dhanki-nagar-panchayat : ढाणकी शहरातील निवडणुकीचे निकाल हाती येताच सर्व पक्षाचे पदाधिकारी सत्ता समीकरण जुळवण्यात मग्न आहेत. भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगळ्या युतीची मोर्चेबांधणी करणे सुरू आहे. यात कोण यशस्वी होईल हे सांगता येत नाही.
 
 
 
y6Jan-Dhanaki-N.-P.
 
 
 
शिवसेना (उबाठा) गटाचा नगराध्यक्ष जनतेतून निवडून आला. मात्र ढाणकीच्या जनतेने भाजपाला कौल दिला. भाजपाचे सर्वाधिक 7 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर 3 नगरसेवक शिव सेनेचे, 3 नगरसेवक एमआयएमचे, 2 नगरसेवक काँग्रेसचे तर 2 नगरसेवक हे अपक्ष निवडून आले आहेत.
 
 
एकूण पक्षीय बलाबल पाहिले तर 17 पैकी 7 नगरसेवक हे एकट्या भाजपाला निवडून आणता आले. बाकींना 3 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणता आले नाही. हे पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपा दोन अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतो. तर दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक पक्ष एकमेकांच्या विचारपासून दूर असले तरीही सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
 
 
त्यात शिवसेना, एमआयएम व काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करू शकते. पण अशी युती शक्य नाही कारण अशी युती झालीच तर ती न टिकणारी अभद्र युती होईल, असेही मत काही राजकीय समीक्षक व्यक्त करत आहेत. सत्तेसाठी समीकरण जुळवण्यासाठी शिवसेना अग्रेसर असून उपाध्यक्षपद शिवसेनेच्या पारड्यात पडावे हा त्यांचा मानस आहे. पण एमआयएम सोबत यांची युती होईल हे ही वाटते तितके सोपे नाही.
 
 
शिवसेनेच्या 3 पैकी 2 नगरसेवकांची इच्छा एमआयएमसोबत युती करण्याची नाही. तर केवळ एक नगरसेवक स्वतः उपाध्यक्ष पद मिळावे म्हणून ही युती घडवून आणण्यासाठी इच्छुक असल्याचे चालू घडामोडीमुळे दिसते. नगरपंचायतच्या सत्ता समीकरणाचा तिढा लवकर सुटावा व नगरपंचायतला एकदाचे स्थिर सरकार मिळावे अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0