वणी,
saptashrungi-devi महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि मानाचे स्थान आहे. तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुकादेवी, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तश्रृंगी देवी ही राज्यातील श्रद्धेची प्रमुख केंद्रे मानली जातात. या साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तश्रृंगी देवीचे स्थान विशेष असून तिच्याशी निगडित एक आगळीवेगळी आणि कमी परिचित अशी आख्यायिका आजही भक्तांच्या मनाला स्पर्श करून जाते.

देवी म्हणजे भक्तांसाठी साक्षात मातेचं रूप. लहान–मोठा, गरीब–श्रीमंत, कुठलाही भेद न करता आईचं प्रेम सर्वांसाठी समान असतं. जसं आई आपल्या लेकरांवर अपार माया करते, तसंच वात्सल्य सप्तश्रृंगी देवी आपल्या भक्तांवर करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच मायेचं प्रतीक ठरणारी एक कथा सप्तश्रृंगी देवीच्या वाकड्या मानेमागे दडलेली आहे. पुराणकथेनुसार, एकदा मार्तंडेय ऋषी सप्तश्रृंगी देवीसमोर दुर्गासप्तशतीचे पठण करत होते. saptashrungi-devi मंत्रोच्चारामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता आणि देवी शांतपणे हे पठण ऐकत होती. मात्र त्याच वेळी कुठेतरी एक भक्त गंभीर संकटात अडकल्याची जाणीव देवीला झाली. मदतीसाठी केलेली त्याची आर्त प्रार्थना थेट आईच्या हृदयापर्यंत पोहोचली.
देवी असली तरी शेवटी ती आईच. आपल्या लेकरावर संकट ओढावलेलं पाहून तिचं हृदय करुणेने भरून आलं. क्षणाचाही विलंब न करता देवीने ऋषींचं पठण अर्धवट सोडलं आणि त्या भक्ताच्या मदतीसाठी धाव घेतली. देवीने भक्ताच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवत त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं संकट दूर केलं. saptashrungi-devi या घटनेत देवीने दुर्गासप्तशतीचं श्रवण पूर्ण न करता अर्धवटच सोडलं. याचाच प्रतीकात्मक अर्थ म्हणून सप्तश्रृंगी मातेची मान किंचित वाकडी असल्याचं मानलं जातं. भक्ती, श्रद्धा आणि विश्वास हे शास्त्र, विधी आणि परंपरेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, हा संदेश या कथेतून दिला जातो.
आजही सप्तश्रृंगी देवी आपल्या भक्तांकडे मान वळवून पाहते, त्यांच्या अडचणी ऐकते आणि त्यांचे रक्षण करते, अशी भाविकांची ठाम श्रद्धा आहे. म्हणूनच सप्तश्रृंगी मातेची प्रतिमा वाकड्या मानेसह दिसते आणि तिची हीच करुणामय मुद्रा भक्तांसाठी आश्वासक ठरते. हीच सप्तश्रृंगी देवीची महती आणि मातृत्वाची अमर कथा मानली जाते.