यजिमस बँकेच्या सहकारी सोसायटी बँक प्रतिनिधींचा सत्कार

06 Jan 2026 19:06:12
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
Kisan Wankhede : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकारी सोसायट्यांमधून निवडून आलेल्या बँक प्रतिनिधींचा सत्कार समारंभ मंगळवार, 6 जानेवारी रोजी विठ्ठलबाग येथे उत्साहात पार पडला. आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
 
 
y6Jan-Pratinidhi
 
या समारंभास आमदार किसन वानखेडे यांच्यासह माजी आमदार प्रकाश देवसरकर, विजय खडसे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, जिनिंगचे माजी अध्यक्ष बालाजी उदावंत, किशोर वानखेडे तसेच डॉ. अंकुश देवसरकर उपस्थित होते. बँकेशी संलग्न एकूण 52 सहकारी सोसायट्या असून त्यापैकी 50 ठिकाणी बँक प्रतिनिधींची निवड यशस्वीरीत्या झाली आहे. दोन सोसायट्यांमध्ये तांत्रिक कारणांमुळे प्रतिनिधी निवड होऊ शकलेली नाही.
 
 
 
विशेष म्हणजे, गेल्या सुमारे 30 वर्षांपासून प्रकाश देवसरकर बँकेवर सातत्याने प्रतिनिधित्व करीत आले आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा उल्लेख यावेळी अनेक वक्त्यांनी केला. काही प्रतिनिधींनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया देत, सहकार क्षेत्रातील विश्वास व पारदर्शकतेची परंपरा कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली.
 
 
दरम्यान, बँक संचालक मंडळाची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही निवडणूक लांबणीवर गेली असली तरी तिच्या तयारीला आतापासूनच वेग देण्यात आला आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी संघटनात्मक बांधणी, सभासद संपर्क व प्रचार रणनीती आखण्यात गुंतले असून सहकार पॅनेल मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त होत आहे.
 
 
सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींनी सहकार चळवळ अधिक सक्षम करण्याची शपथ घेतली. जिल्ह्यातील आर्थिक विकासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची राहणार असून ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0