डॉ. रवींद्रपाल सिंग व डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी फरार

07 Jan 2026 21:01:19
चंद्रपूर,
kidney-selling-racket-case : अवघ्या देशाचे लक्ष वेधणार्‍या किडनी विक्री रॅकेट प्रकरणातील आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग व डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी या दोघांनाही पोलिसांनी फरार घोषित केले असून, त्यांच्या अटकेसाठी आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. एक-दोन दिवसात पथक दिल्ली आणि पंजाबकडे रवाना होणार आहे.
 
 
 
kidney-selling-racket-case
 
 
 
बुधवारी चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत दिल्लीचे डॉ. रवींद्रपाल सिंग याचा जामीन फेटाळला गेला. तर, डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी या आरोपीनेही ट्रान्सिट जामीनसाठी अर्ज केला आहे. तसेच चंद्रपूर पोलिसांच्या अटके त असलेला मुख्य दलाल ‘डॉ. कृष्णा’ उर्फ रामकृष्ण सुंचू यानेही जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला आहे.
 
 
ज्याची किडनी काढली गेली तो पीडित आणि नंतर याच रॅकेटचा दलाल झालेला हिमांशु भारद्वाज व तारिक अहमद या दोघांचे नोंदवले बयाण डॉ. रवींद्रपाल सिंग यांनीच अवैधरित्या शस्त्रक्रिया केल्याचा पुराव असून, आरोपी रामकृष्ण सुंचू, हिमांशु, तारिक आणि डॉ. सिंग या सार्‍यांचे शस्त्रक्रियेच्या दिवशी एकाच ठिकाणी असल्याचे ‘लोकेशन’ही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या सार्‍या आरोपींविरूध्द भक्कम पुरावे ‘एसआयटी’कडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. पैश्याची देवाणघेवाण मात्र हवालाच्या माध्यमातून झाल्याचे पुढे आले आहे.
 
 
एकूण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तामिळनाडूच्या त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पीटलचा संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यानेही अग्रीम जामीन मिळावा म्हणून हातपाय हलवले आहे. मात्र तोही फरार आहे. मिंथूर येथील पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या सार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्याचे जाळे भारतभर असल्याचे समोर येत आहे.
 
‘त्या’ पाचही पीडितांची कुंडली पोलिसांकडे
 
 
कंबोडियात किडनी काढण्यासाठी रोशन कुळे यांच्यासोबत गेलेल्या आणखी पाच जणांची संपूर्ण कुंडली पोलिसांकडे असून, हे सारेच जण कर्जबाजारी व गरीब असल्याचा त्यांच्यात समान धागा आहे. हेच घेरून ‘डॉ. क्रिष्णा’ यांनी त्यांना जाळ्यात ओढले होते. या पाच जणांत बिहार राज्यातील शंकर जयस्वाल असून, त्याचे दुकान डबघाईस आले होते. तर राजस्थानचा मनोज शेसमा हा शेअर बाजारात कर्जबाजारी झाला होता. हरियाणाचा सुमित शर्मा हाही गरीबच होता. तर तारिक अहमद हा ट्रॅव्हल्स एजन्सीच्या व्यवसायात कर्जबाजारी झाला होता. गोपाल नामक पीडितचा शोध सुरू आहे.
 
 
किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी तामिळनाडूतही समिती
 
 
तामिळनाडू येथेही या किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी एक समिती गठित करण्यात आली असून, त्यात तामिळनाडूतील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. त्या समितीचे प्रमुख वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालनालयाचे अतिरिक्त संचालक आहेत. या प्रकरणात तामिळनाडूतील डॉक्टरांचा संबंध आहे का, याची चौकशी ही समिती करीत असून, लवकरच तामिळनाडू सरकारला अहवाल सादर करणार आहे. तसेच त्या निष्कर्षांच्या आधारे कारवाईही केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0