अमरावतीतील महापालिका निवडणूक पक्षांतर्गत तणाव

07 Jan 2026 11:44:32

अमरावती,
amravati municipal corporation अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीला नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रणसंग्रामाची सुरुवात झाली आहे. ही निवडणूक केवळ सत्ताबदलापुरती मर्यादित नसून, अनुभव विरुद्ध बंडखोरी असा संघर्ष उभा राहणार आहे. यंदा १९ माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीमुळे ही निवडणूक ऐतिहासिक वळणावर आली आहे.

 

अमरावती  
 
 
अमरावती महानगरपालिकेच्या ३३ वर्षांच्या इतिहासात सलग निवडणुकीत विजय मिळवणारे विलास इंगोले हे एकमेव नगरसेवक ठरले आहेत. इंगोले यांनी अनेक टर्म्समध्ये नगरसेवक तसेच महापौरपदाची जबाबदारी पार पाडली असून, त्यांचा अनुभव यंदाही काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ते जवाहरगेट बुधवारा प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवत आहेत.

इतिहासाकडे पाहता, भाजपचे कुसुम साहू आणि चेतन पवार प्रत्येकी पाच वेळा, तर प्रदीप बाजड सुमारे चार वेळा विजय मिळवला आहे. प्रकाश बनसोड यांनीही तितक्याच वेळा सभागृह गाठले. बाळू भुयार, रतन डेंडुले, मिलींद बांबल, राधा कुरील, प्रमोद पांडे आणि सुनंदा खरड हे नगरसेवक दोन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत. काही माजी नगरसेवक निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत करतात, तर काहींनी पक्षबदल किंवा बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे.

यंदा सर्वात मोठा धक्का म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांना आतून बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. माजी नगरसेवकांपैकी किमान ८ ते १० जण या वेळी पक्षविरोधात किंवा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपमध्ये ही बंडखोरी सर्वाधिक आहे, नाकारलेल्या उमेदवारांचा रोष स्पष्ट दिसतो, तर काँग्रेसलाही अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. काही भागात तर थेट बंडखोरीची घोषणा झाली आहे, तर काही माजी नगरसेवकांनी निवडणूक न लढवता राजकीय विश्रांती घेतली आहे.

या बंडखोर उमेदवारांमुळे पारंपरिक मतपेढ्या तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९९२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहायला मिळाली आहेत. यंदा १६ जानेवारीला सतराव्या महापौराची निवड होणार आहे, ज्यासाठी सत्तासमीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

एकंदरीत, अनुभवसंपन्न माजी नगरसेवक विरुद्ध नाराज बंडखोर, पक्षनिष्ठा विरुद्ध व्यक्तिगत ताकद, जुने चेहरे विरुद्ध नव्या प्रयोग या त्रिसूत्रीवर यंदाची महापालिका निवडणूक लढवली जाणार आहे.amravati municipal corporation अमरावतीच्या राजकीय इतिहासात हा संघर्ष निश्चितच नवा अध्याय लिहणार आहे.

Powered By Sangraha 9.0