गोंदिया,
chandori-khurd-child-marriage : बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह विरोधात अनेक कडक कायदे असूनही बालविवाह होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार तिरोडा तालुक्यातील सलोटपार-केसलवाडा येथे ६ जानेवारी रोजी समोर आला. दरम्यान दामिनी पथक, जिल्हा महिला बाल विकास विभाग, इंडियन वेलफेअर सोसायटी व तिरोडा पोलिसांनी वेळीच कारवाई करीत नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच नियोजित बालविवाह थांबविला.

सलोटपार येथे ६ जानेवारी रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. माहिती मिळताच, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, इंडियन सोशल वेलफेअर व तिरोडा पोलिसांचे एक पथक तयार करून नियोजित वरवधुंचे जन्म प्रमाणपत्र स्थानिक ग्रामसेवकाकडून मागविण्यात आले. प्रमाणपत्राची पाहणी केली असता बालिकेचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे आढळले. इकडे, विवाहस्थळी विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. डीजे, नाचगाणे, जमलेली वर्हाडी, जेवनाची तयारी सर्व तयार होते. दरम्यान, प्रशासनाचे पथक सलोटपार येथे पोहचले व नियोजित बालविवाह थांबविला.
यावेळी पथकातील अधिकार्यांनी वरवधुंच्या आईवडील व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक २००६ कायद्याची माहिती देऊन बालविवाहामुळे होणार्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती केली. तसेच लग्नाचे वय पूर्ण होण्यापूर्वी बालिकेचे लग्न करणार नसल्याचे हमीपत्र वराच्या आईवडील, नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. सोबतच जमलेल्या वर्हाडी मंडळीची बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वात दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, संरक्षण अधिकारी मुकेश पटले, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, भागवत सूर्यवंशी, रुपेश चुंडूके, धर्मेंद्र भेलावे, आशिष पुंडे, पूजा डोंगरे, अमित बेलेकर, पुर्नाप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, अमोल पानतावणे, प्रशांत बन्सोड, वैशाली भांडारकर, सुवर्णा मडावी, सोनाली टिके, प्रीती बुरेले यांनी केली.
तीन विवाह थांबविले, तिरोड्यातील दुसरे
जिल्ह्यात १४ नोव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान बालविवाह मुक्त गोंदिया करण्यासाठी संकल्प अभियान सुरू आहे. या अभियानादरम्यान, जिल्ह्यात नियोजित तीन बालविवाह थांबविण्यात आले आहे. यात गोरेगाव तालुक्यातील एक तर तिरोडा तालुक्यात दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले.
कायदेशीर तरतूद...
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार, १८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. आपल्या परिसरात असा कोणताही बालविवाह होत असल्यास त्वरित ‘चाइल्ड लाईन १०९८’ किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाते.