अमरावती,
chandrashekhar-bawankule : महापालिका निवडणुकीत कमळाच्या विरोधातला प्रचार कोणत्याही स्थितीत मान्य नाही. कोणत्या पदाधिकार्यांनी तो केला तर पक्ष त्याची योग्य दखल घेईल, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा वचननामा त्यांनी बुधावारी हॉटेल मैफिल येथे प्रसिद्ध केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. अनिल बोंडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, आ. संजय कुटे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, आ. केवलराम काळे, आ. राजेश वानखडे, किरण पातुरकर, शिवराय कुळकर्णी, सुनील खराटे, संजय तिरथकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्ष मोठा आहे.जे नेते विरोधात काम करीत आहेत, त्यांची पक्ष योग्य वेळी दखल घेणार आहे. त्यांनी भाजप उमेदवारांसाठी काम करणे व त्यांना निवडून आणणे अपेक्षीत आहे.
वचननामावर ते म्हणाले, अमरावती शहर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कक्षेत आणू, शहराच्या विकासासाठी शासनाकडे ११० कोटीचा प्रस्ताव ठेऊ, प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देऊ, नेहरू मैदानाचा विकास करू, एसएसआरडीसीच्या माध्यमातून शहरातल्या १० जागांचा विकास करू, आयटी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करू, पाणी पुरवठा योजनेच्या नव्या पाईप लाईनचे काम लवकर पूर्ण करू, भुयारी गटार योजनेचे काम हाती घेऊ, छत्री व वडाळी तलावाचा विकास करू, अंबा व एकविरा देवी परिसराचा विकास आराखडा मंजूर करू, अंबा नाल्याचे बांधकाम करू, स्वच्छ व सुंदर शहरासाठी कचरा व्यवस्थापनाची नवी पद्धत आणण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. भाजपाला मत म्हणजे विकासाला मत, असे समिकरण आहे. शहराच्या विकासाचे द्वार उघडण्याची वेळ आली. नारिकांनी आमच्या शहरा विकासाच्या वचननाम्याची दखल घेऊन भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.