नागपूर,
Devendra Fadnavis will be in Nagpur tomorrow. नागपूर शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि सरकारच्या कामगिरीबाबत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ हा विशेष संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरतर्फे आयोजित हा कार्यक्रम गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिव्हिल लाईन्समधील पाम रोडवरील ‘स्वागत लॉन’ येथे होणार आहे. या संवाद कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. शहरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम शहरातील प्रमुख ५० चौकात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे स्क्रीनवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. यामुळे कार्यक्रम शहरभर पोहोचवला जाईल आणि नागपूरकरांनाही त्याचा अनुभव घेता येईल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.

कार्यक्रमाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुप्रसिद्ध हास्य कलाकार भारत गणेशपुरे यांनी मुख्यमंत्रींची विशेष मुलाखत घेणार आहेत. यावेळी नागपूरच्या विकासाचे व्हिजन मांडताना शहराची खास ओळख असलेला ‘तर्री-पोहा’चा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. भाजप नागपूर महानगरचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहून शहराच्या प्रगतीबाबत आपले विचार मांडण्याचे आवाहन केले आहे. युवामोर्चा अध्यक्ष सचिन करारे, महासचिव रितेश पांडे, रिषभ अरखेल, नागेश साठवणे, कुलदीप माटे आणि युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांनी शहरातील ५० ठिकाणी थेट प्रक्षेपणाचे नियोजन केले आहे. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांचे मत जाणून घेणे आणि नेतृत्वाशी संवाद साधणे या उद्देशाने हा दुहेरी संगम नागपूरकरांसमोर सादर केला जाणार आहे.