शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत हजार रुपयांनी भाव कोसळले

07 Jan 2026 12:02:10

लासलगाव,
crisis onion prices कांद्यावरील निर्यात शुल्क कमी झाल्यानंतर बाजारभाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असून, बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत कांद्याचे दर तब्बल एक हजार रुपयांनी कोसळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे.
 

kanda shetkari 
 
 
आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या दरांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, सलग घसरत्या भावांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लासलगावसह देशातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. पुरवठा वाढल्यामुळे बाजारात दर टिकवणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर बांगलादेशातील सुरू असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे भारतातून होणारी कांद्याची निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे. याशिवाय अरब देशांच्या बाजारपेठांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
 
लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात सुमारे १२०० वाहनांद्वारे २२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला जास्तीत जास्त २१०९ रुपये, किमान ५०० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मात्र हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
 
दरघसरणीचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.crisis onion prices सातत्याने कमी होणाऱ्या दरांमुळे भविष्यात उन्हाळ कांद्याप्रमाणेच लाल कांद्याचेही उत्पादन खर्च निघणे कठीण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
 
या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0