ताडोबा कॉरिडॉरमध्ये लोखंड खाणीला हिरवा कंदील!

07 Jan 2026 15:09:22
मुंबई,
Iron ore mine in the Tadoba corridor भारतातील सर्वाधिक वाघ असलेल्या महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमध्ये राज्य सरकारने लोखंड खाण प्रकल्पास मंजुरी दिली आहे. हा निर्णय पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव संवर्धकांसाठी धक्कादायक ठरला आहे, कारण तज्ज्ञ मंडळाने या खाण प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञांनी या प्रकल्पामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉर आणि वाघांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला होता. मात्र राज्य सरकारने हा विरोध डावलून प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला आहे.
 
 

tadoba 
 
या प्रस्तावावर १६ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. ब्रह्मपुरी परिसरातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेऊन तज्ज्ञांनी अभ्यास समिती नेमली होती. समितीने सादर केलेला अहवाल आणि प्रस्ताव २४ जानेवारी २०२४ रोजी स्थायी समितीसमोर मांडला गेला. या समितीनेही प्रकल्पाला नकार दिला होता. ब्राह्मपुरी तालुक्यातील लोहाडोंगरी गावापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा लोखंड खाण प्रकल्प राखीव जंगलाच्या क्षेत्रात येतो. २०१९ मध्ये नागपूरस्थित एका पोलाद कंपनीने हा खाण ब्लॉक लिलावात मिळवला. प्रस्तावित खाण ब्लॉकमध्ये सुमारे ३६ हेक्टर समृद्ध वनजमीन वळण अपेक्षित आहे. या परिसरात वाघ, बिबट्या आणि इतर वन्यप्राणीही आहेत. त्यामुळे या खाण प्रकल्पामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांसह राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
कोअर भागात सुमारे ७५ वाघ वावरत
प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ १७२७ चौ.किमी. असून त्यातील ११०२ चौ.किमी. संरक्षित क्षेत्र आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर भागात सुमारे ७५ वाघ वावरत आहेत. वन्यजीव संवर्धकांसह स्थानिक तज्ज्ञ आता या निर्णयामुळे होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांकडे चिंता व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील संवेदनशील परिसंस्था आणि वाघांचे संरक्षण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव संवर्धक यांना आता सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करावा लागेल, असा दबाव निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0