मुंबई,
kangana ranaut- बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत गेल्या काही काळापासून चित्रपटांपेक्षा राजकारणात अधिक सक्रिय दिसत होती. हिवाळी अधिवेशनादरम्यान तिने काँग्रेस आणि राहुल गांधींवर केलेल्या टीकेमुळे ती चर्चेत राहिली होती. मात्र आता दीर्घ विश्रांतीनंतर कंगना पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर परतली असून तिच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
कंगनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ही माहिती समोर आली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती दिग्दर्शक मनोज तपारियासोबत सेटवर संवाद साधताना दिसत आहे. दिग्दर्शक तिला चित्रपटातील दृश्ये समजावून सांगताना दिसत असून कंगना सहकलाकार आणि टीमसोबत सहज संवाद साधताना दिसते. या व्हिडिओसोबत तिने, “चित्रपटाच्या सेटवर परत येऊन खूप बरे वाटत आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे.
कंगना kangana ranaut- सध्या ‘भारत भाग्य विधाता’ या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची घोषणा तिने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या रिलीजदरम्यान केली होती. मात्र जवळपास एक वर्षानंतर आता प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘भारत भाग्य विधाता’ची निर्मिती युनोइया फिल्म्सच्या बबिता आशिवाल आणि फ्लोटिंग रॉक्स एंटरटेनमेंटचे आदि शर्मा यांनी संयुक्तपणे केली असून मनोज तपारिया दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. मनोज तपारिया यांनी यापूर्वी ‘मद्रास कॅफे’, ‘चीनी कम’, ‘एनएच १०’ आणि ‘मै’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
‘भारत भाग्य विधाता’ हा kangana ranaut- देशभक्तीपर चित्रपट असून देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि फारसे परिचित नसलेल्या नायकांच्या कथा या चित्रपटातून मांडल्या जाणार आहेत. शौर्य, धैर्य आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र सध्या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.दरम्यान, कंगनाचा शेवटचा प्रदर्शित झालेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकला नव्हता. सुरुवातीला वादांमुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, मात्र काही बदलांनंतर तो प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाली. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती आणि निर्मिती व दिग्दर्शनाची जबाबदारीही स्वतः पार पाडली होती. सुमारे ६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात केवळ २० कोटी रुपयांची कमाई केली होती.आता ‘भारत भाग्य विधाता’च्या माध्यमातून कंगना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत आपली जागा मजबूत करण्याचा प्रयत्न करत असून तिच्या या पुनरागमनाकडे प्रेक्षकांचे आणि उद्योगजगतातील लक्ष लागून राहिले आहे.