नोबेल ट्रम्पना समर्पित केला तरी मचाडो यांना ट्रम्पकडून धक्का!

07 Jan 2026 10:19:34
वॉशिंग्टन,
Machado receives a setback from Trump डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार समर्पित करणाऱ्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनाच आता अमेरिकेच्या धोरणात्मक निर्णयांचा मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. निकोलस मादुरो यांच्या सत्तेचा अंत झाल्यानंतर व्हेनेझुएलाचे नेतृत्व मचाडो यांच्याकडे जाईल, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होती. मात्र ट्रम्प प्रशासनाने ही शक्यता साफ नाकारत मचाडो यांच्याबाबत निराशाजनक भूमिका घेतली आहे.
 
 

setback from Trump 
अमेरिकेच्या विशेष दलांनी मध्यरात्री व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे धडक कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण केल्यानंतर देशात सत्ताबदल अटळ असल्याचे संकेत मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकांपासून मादुरो यांच्या हुकूमशाहीविरोधात लढा देणाऱ्या मारिया कोरिना मचाडो या देशाच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतील, असा कयास बांधला जात होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः पुढे येत या अटकळी फेटाळून लावल्या. व्हेनेझुएलातील परिस्थिती हाताळण्याची क्षमता मचाडो यांच्याकडे नसल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. त्या चांगल्या नेत्या असल्या तरी देशांतर्गत त्यांना पुरेसा पाठिंबा आणि आदर नाही, असे विधान करत ट्रम्प यांनी त्यांच्याबाबत स्पष्ट अंतर ठेवले. त्यामुळे अमेरिकेच्या पाठिंब्यावर सत्तेत येण्याच्या मचाडो यांच्या आशा धुळीस मिळाल्या.
 
५८ वर्षीय मारिया कोरिना मचाडो या गेल्या अनेक वर्षांपासून मादुरो सरकारच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जातात. २०२३ मध्ये त्यांनी विरोधी पक्षाच्या प्राथमिक निवडणुका जिंकत नेतृत्व सिद्ध केले होते. २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत उतरण्याची त्यांची तयारी होती, मात्र त्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर त्यांनी निवृत्त राजनयिक एडमंडो गोंझालेझ यांना पाठिंबा दिला. मात्र या निवडणुकीत गोंझालेझ यांचा पराभव झाला आणि मादुरो पुन्हा सत्तेत राहिले. विरोधकांनी मात्र निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत निकाल आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे.
 
लोकशाही मूल्यांसाठी केलेल्या संघर्षाबद्दल मचाडो यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हुकूमशाही राजवटीतही लोकशाहीची ज्योत पेटती ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा सन्मान स्वीकारताना मचाडो यांनी तो डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला होता. ट्रम्प हे खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे पात्र असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मचाडो या गेल्या अनेक वर्षांपासून ट्रम्प यांच्या धोरणांच्या समर्थक राहिल्या आहेत. मात्र सत्तांतराची संधी प्रत्यक्षात येत असतानाच ट्रम्प यांनी त्यांच्यापासून हात काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मचाडो आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या भूमिकेकडे अनेक जण थेट ‘विश्वासघात’ म्हणून पाहत आहेत.
Powered By Sangraha 9.0