नागपूर,
state-childrens-theater-festival : लहानग्यांचा उत्साह, रंगमंचावरची लगबग, नाटकांच्या तयारीत मग्न चेहरे आणि सेल्फी पॉइंटवर झुंबड अशा चैतन्यमय वातावरणात २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा तिसरा दिवस साजरा झाला. सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे आयोजित या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी एकूण सहा बालनाट्यांचे सादरीकरण झाले.

इतिहासाची ओळख करून देणारे ‘गोष्ट एका स्वातंत्र्याची’ या बालनाट्यातून स्वातंत्र्याचा अर्थ आणि देशप्रेमाची भावना प्रभावीपणे मांडण्यात आली. लोककलेचे महत्त्व सांगणारे ‘मारुतीची जत्रा’ या नाटकाने परंपरा, संस्कार आणि शिक्षणाचा संदेश दिला. टीव्हीच्या अतिरेकावर भाष्य करणारे ‘तेरा मेरा सपना टीव्ही हो अपना’ हे बालनाट्य आधुनिक जीवनशैलीवर नेमके भाष्य करणारे ठरले.मुलांच्या मनातील प्रश्नांना स्पर्श करणारे ‘प्रोजेक्ट त्राहीमाम’ या नाटकातून संस्कार, श्रद्धा आणि जिज्ञासेचे दर्शन घडले. कलावंताच्या संघर्षाची भावनिक कथा सांगणारे ‘अबोल घुंगरू’ हे नृत्यकलेच्या ताकदीचे प्रतीक ठरले. तर रामायणातील प्रसंग साकारत पौराणिक परंपरेची ओळख करून देणारे ‘संगीत विधीलिखित’ प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेले.
शालेय विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरली. मुलांसोबत पालक व रंगमंचप्रेमी प्रेक्षकांनीही गर्दी करत बालनाट्यांना उत्स्फूर्त दाद दिली. आयोजकांनी उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा मुलांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. एकूणच, विविध विषय, सामाजिक संदेश आणि मुलांची सशक्त अभिनयक्षमता यामुळे राज्य बालनाट्य महोत्सवाचा तिसरा दिवस संस्मरणीय ठरला.