नागपूर,
convocation-ceremony : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे तेरावा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता नॅशनल फायर सर्विस कॉलेज, राजनगर, नागपूर येथील ऑडिटोरियम हॉलमध्ये पार पडणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर भूषवतील, तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या स्थापनेला १०२ वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत शैक्षणिक, संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. हिवाळी २०२४ व उन्हाळी २०२५ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ६१ हजार ८७१ विद्यार्थ्यांना या दीक्षांत समारंभात पदवी व पदविका प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये ४९ हजार २३० स्नातक, १२ हजार ८७ स्नातकोत्तर आणि २ डि.लीट. पदवीधारकांचा समावेश आहे.
विद्याशाखानिहाय पात्र पदवीकांक्षींमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील २० हजार ३०८, वाणिज्य व व्यवस्थापन १४ हजार ६२५, मानवविज्ञान १२ हजार ४४१, आंतरविद्याशाखीय अभ्यास ५ हजार ७०९, स्वायत्त महाविद्यालये ८ हजार ५१४ आणि पदविका प्रमाणपत्र २७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट शैक्षणिक यशासाठी १४० विद्यार्थ्यांना एकूण २२९ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यात १९४ सुवर्ण, ८ रजत व २७ रोख पारितोषिकांचा समावेश आहे. विविध अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत.
याशिवाय, विद्याशाखानिहाय २७९ संशोधकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या युट्यूब चॅनेलवर दुपारी ३ वाजेपासून केले जाणार आहे. समारंभास उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी ८ जानेवारी रोजी प्रवेशपत्र परीक्षा विभागातून प्राप्त करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.