रुळांवर नाही, शेडमध्येच ‘वनबाला’

- उच्च न्यायालयाने घेतली दखल

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
नागपूर, 
nagpur-vanbala : सेमिनरी हिल्सच्या हिरव्या परिसराची सफर घडवणारी आणि नागपूरकरांच्या आठवणींमध्ये घर केलेली ‘वनबाला’ टॉय ट्रेन सध्या बंद अवस्थेत आहे. बालोद्यानाच्या सौंदर्यीकरणानंतरही ही लोकप्रिय टॉय ट्रेन प्रत्यक्षात रुळांवर न धावता शेडमध्येच थांबलेली असून, या दिरंगाईची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे.
 
 
JK
वनबाला ही केवळ बालकांसाठीच नव्हे, तर तरुण व ज्येष्ठ नागरिकांसाठीही सेमिनरी हिल्समधील प्रमुख आकर्षण राहिली आहे. मात्र देखभालीअभावी आणि प्रशासकीय लालफितशाहीत अडकून हा उपक्रम गेल्या काही काळापासून रखडला आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून या प्रकरणात हस्तक्षेप केला असून अ‍ॅड. जेमिनी कासट यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे.
 
 
बुधवार दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान वन विभागाने उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. मात्र न्यायालयाने आठवडाभराचा अवधी देत स्पष्ट शब्दांत प्रश्न उपस्थित केला की, “वनबाला नेमकी कधी सुरू होणार?” तसेच जर अडचणी असतील, तर त्या नेमक्या कोणत्या आहेत, याचे सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
 
 
वन विभागाच्या म्हणण्यानुसार, टॉय ट्रेनचे रुळ जुने व खराब झाले असून ती चालवण्यासाठी आवश्यक देखभाल करणे गरजेचे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्ये दीर्घ कालावधीनंतर वनबाला पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र हा प्रवास अल्पकाळ टिकला. त्यावेळी रुळ बदलण्याचे नियोजन झाले होते, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, २०२३ मध्ये ट्रेन सुरू करण्यापूर्वी मध्य रेल्वेने देखभाल केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्टेशनचे स्वच्छता, मजबुतीकरण व रंगरंगोटी केली होती. चार यशस्वी ट्रायल रननंतरच ट्रेनला परवानगी देण्यात आली होती. ४५ वर्षांपूर्वी, डिसेंबर १९७८ मध्ये सुरू झालेली ही २.५ किमी अंतराची टॉय ट्रेन आता न्यायालयाच्या आदेशानंतर तरी पुन्हा धावणार का, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.