ढाका,
Osman Hadi was murdered out of revenge बांगलादेशमध्ये इनकलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी अखेर पोलिसांनी मोठा खुलासा केला असून ही हत्या थेट राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ढाका महानगर पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने सादर केलेल्या तपास अहवालानुसार, बंदी घातलेल्या अवामी लीग आणि तिच्याशी संलग्न विद्यार्थी संघटना छात्र लीगच्या आदेशावरून हा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत १७ जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपी फरार आहेत. ढाका महानगर पोलिसांचे गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मोहम्मद शफीकुल इस्लाम यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, शरीफ उस्मान हादी यांनी सार्वजनिक सभांमधून तसेच सोशल मीडियावरून अवामी लीग आणि तिच्या विद्यार्थी संघटनेच्या भूतकाळातील कारवायांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे छात्र लीग तसेच त्यांच्याशी संबंधित नेते व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. याच रागातून आणि राजकीय सूडातून हादी यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस तपासानुसार, ही हत्या पूर्णपणे नियोजित होती. मुख्य आरोपी फैसल करीम मसूद याने हादी यांच्यावर गोळीबार केला होता. मसूद हा थेट छात्र लीगशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटामागे पल्लबी पोलीस ठाण्याचे माजी नगरसेवक आणि युथ लीगचे नेते तैजुल इस्लाम चौधरी उर्फ बप्पी याची प्रमुख भूमिका होती. बप्पीच्या आदेशावरूनच हा हल्ला करण्यात आला असून, हल्ल्यानंतर मसूद आणि दुसरा मुख्य संशयित आलमगीर शेख यांना पळून जाण्यास मदतही बप्पीनेच केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शरीफ उस्मान हादी हे जुलै–ऑगस्ट २०२४ दरम्यान बांगलादेशमध्ये झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनातील एक महत्त्वाचे नेतृत्व होते. या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार सत्तेतून बाहेर पडले होते. हादी हे या चळवळीचे प्रभावी वक्ते आणि संघटक म्हणून ओळखले जात होते. आगामी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते ढाका-८ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते.
ढाकामध्ये झालेल्या हल्ल्यात हादी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. इन्कलाब मंच आणि विविध संघटनांकडून न्यायाच्या मागणीसाठी ढाकामध्ये तीव्र आंदोलन सुरू होते. गृह व्यवहार सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी आरोपपत्र ७ जानेवारीला दाखल केले जाईल, असे आधी जाहीर केले होते. मात्र वाढत्या दबावामुळे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक दिवस आधीच, ६ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. अतिरिक्त आयुक्त इस्लाम यांनी स्पष्ट केले की, तपासादरम्यान सर्व पुरावे आणि साक्षी ठोसपणे समोर आल्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण होत असताना, हादी हत्येप्रकरणाने देशातील राजकीय हिंसाचार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला आहे.