रब्बीने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत!

07 Jan 2026 20:43:37
गोंदिया, 
farmer-news : जिल्ह्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पहावयास मिळाली. सुरवातीला पावसाचा विलंब व नंतर तीनचारदा शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. यामुळे खरीपातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, आता रब्बी हंगामाने दिलासा दिला असून, जिल्ह्याने रब्बी पेरणीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. जिल्ह्यात रब्बीतील पेरणी पूर्णत्वास आली आहे. रब्बीने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
 
 
 
JK
 
 
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ६२२ हेक्टर आहे. जिल्ह्यात लाखोळी, मोहरी, पोपट, वाटाणा, मका, गहू, हरभरा आदींसह अन्य पिकांची लागवड केली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, मुबलक पाणी उपलब्धतेमुळे रब्बीचा पेरा काहीसा उशिरा झाला असला तरी पीक स्थिती समाधानकारक आहे. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १२८६० हेक्टर क्षेत्रावर पेरणीची नोंद आहे. त्यापाठोपाठ इतर तालुक्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. गोरेगाव तालुक्यात १७१५ हेक्टवर, तिरोडा ४८९५, अर्जुनी मोरगाव ४१९९, आमगाव ७८६ तर सालेकसा तालुक्यात १३०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी पिकांसाठी असलेले पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बागळून आहेत.
 
 
 
खरिपाचा फटका बसलेल्या बळीराजाला आता रब्बी तारणार, असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता धान पिकाला जोड देत अन्य पिकांच्या उत्पादनाकडेही वळला आहे. जिल्ह्यात विविध पिकांचे उत्पादन घेतले जात असून, त्याला कृषी विभागाकडून प्रोत्साहनही दिले जात आहे. जिल्ह्यात शेतकर्‍यांना मक्याचा गोडवा भावला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ११८३.४८ हेक्टर क्षेत्रात मका लागवड झाली आहे. जिल्ह्यात ज्वारी-बाजरी व मक्याचे उत्पादन शेतकरी घेत नव्हते. कृषी विभागाने शेतकर्‍यांना ही बाब लक्षात आणून दिली आहे. परिणामी, आता शेतकरी गव्हासोबतच ज्वारी व मक्याचे उत्पादन घेऊ लागला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0