नांदगाव पेठ,
ratan-india : भाजप नेते विवेक गुल्हाने यांनी सहकार्यांसह सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प व्यवस्थापनाला अखेर माघार घ्यावी लागली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाने मंगळवारी निर्णायक वळण घेतले. कामगार व कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर व्यवस्थापनावर दबाव वाढत गेला आणि मंगळवारी सायंकाळी ७३ कामगारांच्या खात्यात तब्बल २८ लाख रूपये ग्रॅज्युइटी व कपात केलेली रक्कम जमा करण्यात आली. दिल्ली मॅनेजमेंट फॅ सिलिटी कंपनीने तात्काळ रक्कम अदा केली, तर उर्वरित मागण्यांबाबत रात्री दहा वाजता लेखी स्वरूपात रतन इंडिया व्यवस्थापनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले.

आंदोलनारम्यान रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच कार्यकर्त्यांकडून चारही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते, तसेच कोळसा वाहतूक करणारी रेल्वे दिवसभर रोखण्यात आली. यामुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ‘हम करे सो कायदा’च्या भूमिकेत वावरणारे व्यवस्थापन गुल्हाने यांच्या ठाम उपोषणामुळे पुरते हतबल झाले होते. आमदार राजेश वानखडे सकाळपासून उपोषण स्थळी ठिय्या मांडून बसले होते. आमदारांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन व रतन इंडिया व्यवस्थापनाशी थेट चर्चा केल्यानंतर अखेर रात्री दहाच्या सुमारास तोडगा निघाला.
प्रकल्प प्रमुख पगलापती यांनी आमदार राजेश वानखडे यांना दिलेल्या लेखी पत्रात राखेमुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत शासन नियमांनुसार व संबंधित यंत्रणांच्या अहवालातील तांत्रिक त्रुटी दूर करून कार्यवाही केली जाईल, प्रकल्पग्रस्त युवकांच्या रोजगाराबाबत शासन धोरणांनुसार व उपलब्ध पदांच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल, प्रकल्पग्रस्त कामगारांच्या वेतनवाढीचा विषय कंपनीच्या अंतर्गत धोरणांनुसार व कामगिरीच्या आधारावर दरवर्षी विचारात घेतला जाईल, तसेच वाघोली गावातील राख प्रदूषणाबाबत सातत्याने नियंत्रण उपाययोजना राबविल्या जातील, अशी स्पष्ट हमी देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांसोबत बैठक घेऊन झालेल्या चर्चेनुसार १५ दिवसांत केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
लेखी आश्वासन मिळताच आ. वानखडे यांनी विवेक गुल्हाने व सहकार्यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडविले. कामगारांना त्यांच्या कष्टाचे पैसे तात्काळ मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी उपोषणकर्ते विवेक गुल्हाने व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानत लढ्याचा विजय साजरा केला. यावेळी मनीषा गुल्हाने, वीरेंद्र लंगडे, मोनिका पिहुलकर, भारती गेडाम, रेखा गिरी, नागेंद्र तायडे, आकाश गुल्हाने, नितीन काळे, विजय भुयार, सागर खराटे, विजय झटाले, अनिल खंडारे, राजेंद्र तुळे,नरेश गेडाम, संजय खंडारे, गौरव मनोहर, अनिकेत बीजवे यांच्यासह अन्य उपस्थित होते.