अमरावती,
saint-gulabrao-maharaj : विदर्भाच्या अध्यात्मिक, सामाजिक व वैचारिक परंपरेतील एक अत्युच्च शिखर म्हणून ओळखल्या जाणार्या प्रज्ञाचक्षु धर्मसमन्वयमहर्षी, ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज यांची जयंती यावर्षीपासून महाराष्ट्र शासनातर्फे अधिकृतरीत्या साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
सदर निर्णय केवळ एका जयंती उत्सवापुरता मर्यादित नसून राज्याच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैचारिक वारशाला सशक्त अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. विदर्भाच्या भूमीत जन्मलेल्या या अलौकिक संताच्या विचारसरणीला आणि सामाजिक प्रबोधनात्मक कार्याला शासनस्तरावर मान्यता मिळाल्याने संतपरंपरेच्या गौरवात भर पडली असून, महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात हा निर्णय एक महत्त्वाचा अध्याय ठरणार असल्याचे मत महाराजांच्या भक्तांनी व्यक्त केले आहे. श्री संत गुलाबराव महाराज साहित्य प्रचार मोहिमेचे प्रमुख तसेच वारकरी शिक्षण संस्था, तीर्थक्षेत्र बेलोरा (ता. चांदुरबाजार, जि. अमरावती) यांचे प्रसिद्धी प्रमुख माधुर्य ठाकरे यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी नमूद केले की, शासनाने घेतलेला हा निर्णय विदर्भाच्या संतपरंपरेला न्याय देणारा असून, समाजातील विविध घटकांपर्यंत संतांच्या विचारांचा प्रभावी प्रसार घडवून आणणारा आहे.
या प्रक्रियेमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी आमदार प्रवीण पोटे तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वारकरी शिक्षण संस्था, तीर्थक्षेत्र बेलोरा यांच्या वतीने २६ जून २०२३ रोजी शासनाकडे अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात आला होता, ज्यावर सातत्यपूर्ण पाठपुरावा व सकारात्मक प्रशासनात्मक प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विस्मय ठाकरे यांनी या शासकीय निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे श्री संत गुलाबराव महाराज यांची समृद्ध ग्रंथसंपदा, तात्त्विक चिंतन व समाजोद्धारक विचार शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. यापुढे श्री संत गुलाबराव महाराज यांची जयंती राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात येणार असल्याने, महाराजांचे विचार केवळ भक्तांपुरते न राहता सामान्य जनतेपर्यंत, विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. परिणामी विदर्भातील हा अलौकिक संत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचून सामाजिक समरसता, वैचारिक प्रगल्भता व अध्यात्मिक जागृतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, या निर्णयामुळे भक्तपरिवारात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.