वामन पुराण

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
 
 धर्म-संस्कृती 
 
vamana purana भगवान विष्णूंचा पुढील अवतार हा वामन अवतार आहे. ज्या पुराणात वामन अवताराचे प्राधान्याने वर्णन आहे त्या पुराणाला वामन पुराण म्हणतात. वामन अवतार हा मागील अवताराची पुढील कडी आहे. जलचर, उभयचर, भूचरसोबतच पशू, अर्ध मनुष्य, अर्ध पशू आता हा अवतार. मनुष्य पण उंचीने कमी म्हणून वामन असा हा अवतार आहे.
 

vaman avtar 
 
 
वामन भगवान हे त्रिविक्रम विष्णूंचे पाचवे अवतार. वामन पुराण विष्णू भगवंतांच्या अवताराचे गुणगान करीत असल्यामुळे हे वैष्णव पुराण असले, तरी या पुराणात शिव कथांचे प्राबल्य आहे. शैव आणि वैष्णवांची सांगड घालणारे हे पुराण आहे. उपलब्ध वामन पुराणाचे एकूण 95 अध्याय असून श्लोकसंख्या 5792 आहे. वामन पुराणाच्या प्रारंभीच भगवान वामन यांना नमन आहे.
 
‘त्रैलोक्यराज्यमाक्षिप्य बलेरिंद्राय यो ददौ ।
श्रीधराय नमस्तस्मै छद्मवामनरुपिणे ।।’
 
वामन पुराण पुलस्त्य ऋषी आणि नारद संवादाने सुरू होते. एकदा पुलस्त्य ऋषी निवांत बसले असता देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी पुलस्त्य ऋषींना भगवान वामन यांच्याविषयी सांगण्यास विनंती केली. त्यानुसार पुलस्त्य ऋषींनी नारदांना हे पुराण सांगितले... हिरण्यकश्यपूचा वध भगवान नृसिंह यांनी केल्यावर दैत्य गादीवर प्रल्हाद यांचा राज्याभिषेक झाला. प्रल्हादांना विरोचन नावाचे पुत्र झाले. या दैत्यराज विरोचनाच्या पोटी बली जन्माला आले.
 
‘दैत्यानामादिपुरुषो हिरण्यकश्यपू: पुरा ।
तस्य पुत्रो महातेजा: प्रल्हादो नाम दानव: ।
तस्माद् विरोचने जज्ञे बळीर्जज्ञे विरोचनात् ।’
 
यावरून विष्णुभक्त प्रल्हादांचे नातू असलेले बळीराजा होत. बळीराजाचा पुत्र बाणासुर होता. बळीचे सामर्थ्य म्हणजे पराक्रमाने स्वर्गावर अधिपत्य मिळवून स्वत: बळीराजा इंद्र झाला; त्याचा पुत्र बाण यम झाला. मयासुर वरुण, राहू चंद्र, ल्हाद अग्नी आणि शुक्राचार्य बृहस्पती झाले. बळीराजा भक्ती आणि शक्तीचा संगम होते. बळीराजाने आपल्या शक्ती आणि पराक्रमाने देवांना पिटाळून लावले. तिन्ही लोकांवर विजय मिळविला.
 
‘शक्रोभूद् भगवान ब्रह्मन बली बाणो यमो भवत् ।
इवरुणो भुन्मय: सोमो राहूल्हार्दो हुतशन: ।।’
 
विशेष म्हणजे राज्य दैत्यांचे असले, तरी सर्वत्र धर्म राज्य होते. देवी महालक्ष्मी बळीराजावर प्रसन्न होती. देवगण मात्र बेघर झालेत. देवराज इंद्र चिंताग्रस्त होऊन माता अदिती आणि कश्यप ऋषींकडे गेले. आपली व्यथा त्यांना सांगितली. कश्यपांनी स्पष्ट सांगितले की, बळीराजाचा पराभव देवांकडून होणे केवळ अशक्य आहे. अशावेळी कश्यप अदिती देवगण आणि ब्रह्मदेवासह भगवान विष्णूंकडे गेले. त्यांनी क्षीरसागर काठी भगवंतांचे स्त्रोत्र गायन सुरू केले.
 
‘नम: पंकजनेत्राय नम: पंकजनाभये ।
नम: पंकजसंभूतिसंभवायात्मयोनये ।।’
 
भगवान विष्णू प्रसन्न होऊन बळीराजाच्या उपाययोजनेसाठी मी कश्यप-अदितीच्या पोटी वामन म्हणून जन्माला येईन, असे वचन दिले. भगवान विष्णू अदितीच्या गर्भात धारण होताच सर्व दैत्यांची शक्ती क्षीण झाली. राक्षसांचे अचानक अवमूल्यन का होत आहे, असा प्रश्न बळीराजाने आपले आजोबा प्रल्हादांना विचारला असता प्रल्हादांनी अंत:चक्षूंनी पाहिले. राक्षसांना परास्त करण्यासाठीच भगवान वामन जन्म घेणार आहेत. त्यामुळे आपली शक्ती क्षीण होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तेव्हा दैत्यराज बली आपल्या आजोबा म्हणजे प्रल्हादांना म्हणाले की, आपल्या जवळ एकाहून एक दैत्य आहेत.vamana purana आपण वामनांना परास्त करू. तेव्हा प्रल्हाद दैत्यराज बलीवर प्रचंड संतापले... ‘‘अरे! सर्व ब्रह्मांड ज्याचा अंश आहे त्यांच्याविषयी तुझ्या मनात असा दुष्ट भाव असेल तर तुझाही नाश समीप आहे.’’ तेव्हा बळीराजांनी आजोबाची क्षमा मागितली आणि भगवान विष्णूंप्रति शरणभाव ठेवला. अश्वमेघ यज्ञ प्रारंभ केला. इकडे माता अदितीच्या पोटात गर्भ वाढत होता.
 
‘ततो मासेऽथ दशमे काले प्रसव आगते ।
अजायत स गोविंदों भगवान वामनाकृति: ।।’
 
भगवान माता अदितीच्या पोटी वामन आकारात जन्माला आले. सर्वत्र आनंद दाटला. ब्रह्मदेवाने त्यांना मृगचर्म दिले. बृहस्पतींनी यज्ञोपवीत, मरीचींनी पलाशदंड, वशिष्ठांनी कमंडलू, अंगिरा ऋषींनी रेशमी वस्त्र, पुलस्त्य ऋषींनी पितवस्त्र दिले. वामन भगवंत जटा, दंड, छत्र, कमंडलू धारण करून ते बळीराजाच्या यज्ञस्थानी जाण्यास सिद्ध झाले. इकडे बळीराजाला दैत्यगुरू शुक्राचार्यांनी आधीच सावध केले. भगवान विष्णू वामन रूपात येत आहेत.
 
‘त्वयास्य दैत्याधिपते स्वल्पकेपि ही वस्तुनि ।
प्रतिज्ञा नैव वोढव्या वाच्यं साम तथा फलम् ।।’
 
कोणतीही वस्तू देण्याचा संकल्प सोडू नको. प्रतिज्ञा करू नको. तेव्हा बळीराजा म्हणतात की, ‘‘गुरुवर्य, ज्याच्याकडे जग याचना करते तो ईश्वर माझ्या दारात याचक बनून येत असेल तर त्याला मी नकार कसा देऊ?’’ असा संवाद सुरू असतानाच प्रत्यक्ष वामन भगवान तिथे पोचले. बळीराजाने नमस्कार करून, काय सेवा करू? अशी विचारणा केल्यावर भगवान म्हणाले की,
‘मम अग्नी शरणार्थाय देही राजन पदत्रयम् ।’
 
मला अग्निशाळेसाठी तीन पाऊले जमीन हवी! संकल्पपूर्तीसाठी बळीराजाने हातावर जल सोडून जलसिंचन केले. हातावर जल पडताच वामन भगवान अवामन झाले. विराट रूपाने त्यांनी ब्रह्मांड व्याप्त केले.
 
‘प्रणम्य च अर्शिन प्रथम क्रमेन ।’
प्रथम पदन्यासात पृथ्वी व्याप्त केली.
‘देवो द्वितीयेन जहार वेगात ।’
द्वितीय पदन्यासात आकाश व्याप्त केले.
‘क्रमं तृतीयं न यदास्य पूरितं ।’
 
तिसऱ्या पावलासाठी जागा नसल्यामुळे दैत्यराज बळीच्या पाठीवर पाय ठेवून त्याला हजार योजने पृथ्वीत घातला. राक्षसांना परास्त केले. बळीराजावर कृपा करून त्याला सुतल नावाचे पाताळ निवासासाठी दिले. त्याला चिरकाल चिरंजीवित्व दिले. त्याच्या सोबत काही काळ निवास केला. वचन दिल्याप्रमाणे इंद्राला त्याचे राज्य परत केले. वामन पुराणात वामन कथा अध्याय 23 ते 31 आणि अध्याय 73 ते 78 यामध्ये दिली आहे. भगवान वामन कथाभागासोबत इतर अध्यायात भगवान शंकरांची कथा, दक्षयज्ञ, सतीचा प्राणत्याग, दक्षयज्ञ विध्वंस ही कथा दिली आहे. याच पुराणात नर नारायण उत्पत्ती, मदन दहन कथा आहे. उर्वशीची उत्पत्ती, प्रल्हाद आणि नारायण यांचे युद्ध, भक्तीने विजय ही कथा इथेच आहे. हिरण्याक्ष पुत्र अंधकासुर, त्याचा देवांवर विजय. सुकेशीची कथा, 21 नरकांचे वर्णन, पर्वत-नद्यांचे वर्णन या पुराणात आहे. महिषासुर अत्याचार, भगवती कात्यायनीचे प्रकट होणे, चंड, मुंड, महिषासुर वध, कुरुक्षेत्र वर्णन, सरस्वती नदीचे वर्णन, राजा वेन चरित्र, पृथु राजाचा जन्म, वेनराजा कृत शिव स्तुती, ब्रह्मदेवाचे चार मुख उत्पत्ती कथा, हिमालय पत्नी मैनादेवीच्या पोटी तीन कन्यांचा जन्म, उमादेवीची तपश्चर्या, उमा-महेश्वर विवाह, विश्वकर्मा द्वारा उमा-शिव यांच्यासाठी गृह निर्माण हे विषय वामन पुराणात आले आहेत. भगवतीद्वारा नमुची वध, शुंभ-निशुंभ, धूम्रलोचन, चंडमुंड वध, भगवान कार्तिकेय जन्म, नंदीद्वारा हरी आणि हराचे अद्वैत. याशिवाय स्वायंभुव, स्वरोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष मन्वंतराच्या मरुद्गण उत्पत्ती, कालनेमीचे भगवान विष्णूंशी युद्ध, कालनेमी वध, प्रल्हाद यात्रा, गजेंद्र मोक्ष कथा, विविध स्तोत्र इत्यादी बाबी वामन पुराणात आहेत.
वामन पुराण शैव वैष्णव आणि शाक्त यांचा एकात्म संगम आहे. या पुराणातून मिळणारा संदेश म्हणजे बळीराजा राक्षस कुळात जन्माला येऊनही प्रल्हादाच्या संस्कारांमुळे देवतुल्य झाला. आपण तर माणूस आहोत. आपण नर का नारायण होऊ शकतो. म्हणूनच दर रक्षाबंधनाला आपल्याला बळीराजाचे स्मरण करून देण्यासाठी पौराणिक मंत्र दिला आहे.
 
‘ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वाम् प्रतिबध्नामि रक्षे मा चलमाचल ।।’
 
आताच्या परिप्रेक्ष्यात यात अजून लक्षात घेऊ- वामन म्हणजे विनम्रता, लहानपण ठेवण्याची वृत्ती. माणसाने आपल्या सामर्थ्याचे उगाच प्रदर्शन करू नये. आवश्यक त्या ठिकाणी त्याचा वापर जरूर करावा, पण मिथ्याभिमान नको. वामनाला अवामन होता येते. त्यामुळे जीवनात कधी कमीपणा घ्यावा लागला म्हणजे आपले नुकसान झाले, अपमान झाला, स्वाभिमान दुखावला असे नसते. प्रत्यक्ष विश्वाचा नियंता विश्वकल्याणासाठी लहानपण घेतो, याचक बनतो आणि प्रसंगी विराट रूप दाखवतो. अफजलखान वधाच्या वेळी छत्रपतींनी हीच भूमिका घेतली. लहानपण घेतले आणि वेळ येताच राक्षसाचा वध केला. हाच या पुराणाचा संदेश आहे.
 
प्रा. दिलीप जोशी
9822262735