वर्धा,
wardha-krida-bharati : वर्धेतील तरुण पिढीला शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी आणि लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खेळांचे जतन करण्यासाठी क्रीडा भारती द्वारे लाठी-काठी व कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद महानकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत, तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत व्यावसायिक कार्य प्रमुख शेखर केळकर, मार्शल आर्ट व लाठी काठीचे मुख्य प्रशिक्षक अभिजित पारगावकर उपस्थित होते.
याप्रसंगी स्थानिक खेळाडूंनी सादर केलेली लाठी-काठीची प्रात्यक्षिके. हवेत फिरणारी लाठी आणि स्वसंरक्षणाचे डावपेच पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी कबड्डीचा दर्शनीय सामना झाला. प्रसाद महानकर म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात मुलं मैदानी खेळांपासून लांब जात आहेत. लाठी-काठीसारखी आपली प्राचीन युद्धकला आणि कबड्डीसारखा मातीतील खेळ आत्मसात केल्यास तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होईल. हे केंद्र केवळ खेळाडूच नाही तर सुदृढ नागरिक घडवण्याचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला.
या केंद्रात तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांसोबतच मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे म्हणून लाठी-काठीचे विशेष वर्ग चालवले जातील, अशी माहिती जिल्हामंत्री व आयोजक सारंग परिमल यांनी दिली. संचालन योगेश केळकर यांनी केले. यशस्वीतेकरिता क्रीडा भारतीचे पदाधिकारी अमितप्रसाद, प्रवीण खवशी, संदीप आपटे, सुशील लोहिया, स्वप्नील पांडे, साहिल तराळे, दिव्यांनी विरूळकर, भारती गोमासे, मनीषा माशानाकर, दीपाली हिंगणीकर, कविता कांबळे, रुपाली परदेशी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.