सव्वा कोटीच्या सुगंधित तंबाखू तस्करीवर गुन्हे शाखेची टाच

07 Jan 2026 20:30:18
वर्धा, 
smuggling-of-scented-tobacco : कंटेनरमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर येथील संविधान चौकात नाकाबंदी करून संशयित कंटेनरला अडवून चौकशी केली. या कंटेनरमध्ये १.२४ कोटींचा सुगंधित तंबाखू आढळून आला. विनापरवाना या सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंटेनरसह सुगंधित तंबाखू असा १ कोटी ५४ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
KL
 
 
वर्धा येथील गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात गस्तीवर असताना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना जी. जे. २७ टी. डी. ९९१६ क्रमांकाच्या कंटेनरमधून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने वेगवेगळे पथक नेमून हिंगणघाट ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर येथील संविधान चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयित कंटेनर दिसताच चालकाला थांबवून चौकशी केली. चालक आणि वाहकाला नाव विचारले असता विनोदकुमार रामबहादूर यादव (३४) रा. नारोल जि. अहमदाबाद, गुजरात व लिनर कमलेश छोटेलाल वनवासी (२६) रा. भगवतगंज जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश असे सांगितले. कंटेनरची पाहणी केली असता सुगंधित तंबाखू व इतर साहित्य असल्याचे आढळून आले. चालकाला वाहतुकीचा परवाना विचारला असता तो नसल्याचा सांगितला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकारी पियूष मानवतकर यांच्याशी संपर्क केला.
 
 
यावेळी ५५ लाख ४४ हजार रुपयांचा ईगल सुगंधित तंबाखू, ४२ लाख ४० हजारांचा होला तंबाखू आणि मजा कंपनीचा २६ लाख २९ हजार ६०० असा १ कोटी २४ लाख १३ हजार ६०० रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि कंटेनर ३० लाख असा एकूण १ कोटी ५४ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक विनोदकुमार राम बहादूर यादव आणि लिनर कमलेश छोटेलाल वनवासी यांच्याविरुद्ध वडनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी पियूष मानवतकर, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, विजयसिंग गोमलाडू, राहूल इटेकर, प्रकाश नागापुरे, मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनूरकर, अमर लाखे, अमरदीप पाटील, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, गजानन दरणे, रोशन निंबाळकर, रवी पुरोहित, मंगेश आदे, रितेश कुराडकर आदींनी केली.
Powered By Sangraha 9.0