तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal Health Department राज्यातील विविध भागांत आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळ जिल्हा आरोग्य विभाग पुढे आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 3.8 लाख रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी 3.08 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे सोपवला. या निधीचा विनियोग पूरग्रस्तांच्या पुनर्वसन आणि तातडीच्या मदतीसाठी करण्यात येणार आहे. हा मदतनिधी सुपूर्द करताना जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत चुंभळे यांचा समावेश होता.
आरोग्य विभागात कार्यरत असणारे डॉक्टर, कर्मचारी आणि अधिकाèयांनी आपल्या पगारातून हा निधी संकलित केला आहे. संकटकाळात पूरग्रस्तांना आधार मिळावा, या उद्देशाने आरोग्य विभागाने हा छोटासा प्रयत्न केला आहे, अशी भावना डॉ. सुभाष ढोले यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून इतर विभागांनीही अशा प्रकारे मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.