चंद्रपूर,
vijay-wadettiwar : अवैध सावकारांच्या अमानवी पाशात अडकलेला शेतकरी रोशन कुळे याला त्याची किडनी विकावी लागली. पूर्व विदर्भातील अशा अनेक शेतकर्यांचा श्वास अद्यापही या सावकारांच्या विळख्याखाली कोंडला जात आहे. ज्यांनी रोशन कुळे याला किडनी विकायला भाग पाडले, त्या अवैध सावकारांना पाठीशी घालण्याचे काम काही राजकीय नेते करीत आहे. मी कुणाचे नाव घेणार नाही. पण कुळे याच्यावर दबाव आणला जात आहे असा आरोप करीत, या अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनाने ‘एसआयटी’ नेमावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे केली.
रोशन कुळे याच्यामुळे देशातील किडनी विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांचा हा तपास आजघडीपर्यंत तरी योग्य दिशेने सुरू आहे. पण अवैध सावकारांचाही पर्दाफाश करण्याची गरज आहे. या सावकारांचे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. पाच-सहा सावकार मिळून कर्जबाजारी सावज हेरतात आणि त्याची जमिन आपल्या नावे करतात आणि ती परस्परांमध्ये विकतात आणि शेवटी बाहेरच्या व्यक्तीला विकून मोकळे होतात. त्यांनी लावलेला व्याजाचा दर एवढा जास्त असतो की, शेतकरी त्यांचे कर्ज कधीच फेडू शकत नाही. असा प्रकार केवळ चंद्रपूर जिल्ह्यात नाही, तर पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर सरकारने तातडीने आळा घातला पाहिजे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.
येत्या दोन दिवसात गौप्यस्फोट करणारः रोशन कुळे
अवैध सावकारांमुळे ज्यांना आपली किडनी विकावी लागली आणि ज्यांच्यामुळे पुढे मोठे किडनी रॅकेट उघडकीस आले, ते रोशन कुळे पहिल्यांदाच जाहीरपणे आ. वडेट्टीवार यांच्यासह प्रसारमाध्यमांसमोर आले. कुळे म्हणाले, किडनी काढून विकल्यानंतर मी चीन जवळील ‘लॉस’ या देशात एका कॉल सेंटरमध्ये काम केले. तेथे माझ्यावर मोठा अन्याय झाला. शेवटी आ. वडेट्टीवार यांच्या सहकार्याने मी आपल्या देशात येऊ शकलो. मला अद्यापही सावकारांनी हडपलेले माझे पैसे परत मिळालेले नाही. पण त्यांना पाठीशी घालणार्यांचा माझ्यावर दबाव आहे. येत्या दोन दिवसात मी त्याबाबत गौप्यस्फोट करणार आहे, असा सुतोवाच रोशन कुळे यांनी केला.
‘बावनकुळे, मुनगंटीवार यांनीही सहकार्याचे आश्वासन दिले’
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सावंत आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे रोशन कुळे म्हणाले.