भंडारा,
Bhandara public library, वाचनालय म्हटलं की वाचन संस्कृती एवढेच आम्हाला माहिती आहे. मात्र वाचनालयातून कला, संगीताचीही जोपासना केली जाऊ शकते, हे सांगणारा अनोखा प्रयोग भंडाऱ्याच्या सार्वजनिक वाचनालयाने केला आहे. भजन सप्ताहासारखी आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात उतरवून कलावंतांना व्यासपीठ मिळवून देतानाच भारतीय संस्कृतीचा कणाही सुदृढ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 450 हून अधिक कलावंत या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
अत्यंत जुन्या असलेल्या सार्वजनिक वाचनालयाने नेहमीच आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. सार्वजनिक वाचनालयात होणारी व्याख्यानमाला श्रोत्यांसाठी पर्वणी असते. मात्र वाचनालयाने आता व्याख्यान आणि वाचन संस्कृती एवढ्या पुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता सांस्कृतिक क्षेत्रातही अभिनव प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल आणि कार्यवाह प्रा. सुमंत देशपांडे यांनी यावेळी भजन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. रोज पाच भजनी मंडळांना भजन सादर करण्याची संधी आणि त्यांचे कौतुक असा प्रयोग वाचनालय करीत आहे. 5 ते 12 जानेवारी या कालावधीत हा सप्ताह साजरा होणार असून त्यासाठी 45 भजनी मंडळाने नोंदणी केली आहे. एका भजनी मंडळात 10 ते 12 सदस्यांचा सहभाग राहणार असल्याने 450 हुन अधिक लोकांना व्यासपीठ मिळणार आहे. समारोपाच्या दिवशी या सर्व भजनी मंडळांना एकत्रित करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या अभिनव प्रयोगाला भंडारा शहरातील भजनी मंडळांनी दिलेला उदंड प्रतिसाद वाचनालयाचा प्रयोग यशस्वी करणार आहे. ही स्पर्धा नाही, मात्र कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल नक्कीच आहे. सर्व वादनाच्या साहित्यासह सुसज्ज असे आणि साहित्य नसतानाही केवळ आवड आणि संधी म्हणून या अभिनव प्रयोगाकडे पाहून सहभागी झालेल्या भजनी मंडळाकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे. वाचना पुरते मर्यादित न ठेवता इतर वाचनालयाने टाकलेले पाऊल नक्कीच वेगळेपण जपणारे आहे.
.....