दीड एकरात टमाटरचे ९ लाखाचे उत्पन्न

09 Jan 2026 21:39:44
सतीश अकोलकर
अचलपूर,
tomatoes grown परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देत अचलपूर येथील एका युवा शेतकर्‍याने अल्प क्षेत्रात मोठे उत्पन्न मिळवून परिसरातील शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दीड एकर शेतीमध्ये टमाटरची लागवड करून सुमारे नऊ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणार्‍या या युवा शेतकर्‍याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

tamato 
 
 
साहिल श्रीधर क्षिरसागर (वय २३, रा. नौबागपुरा, अचलपूर) असे या प्रगतिशील शेतकर्‍याचे नाव असून तो बी. कॉम. पदवीधर आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्येच करिअर घडवण्याचा निर्धार त्याने केला. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर ती फायदेशीर व्यवसाय ठरू शकते, हे साहिलने आपल्या कामातून सिद्ध करून दाखवले आहे.
टोमॅटो लागवडीसाठी साहिलने माती परीक्षण, योग्य वाणाची निवड, ठिबक सिंचन, संतुलीत खत व्यवस्थापन आणि वेळेवर कीड-रोग नियंत्रण यावर विशेष भर दिला. लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन केल्यामुळे उत्पादनाचा दर्जा उत्तम राहिला. परिणामी त्याच्या शेतातील टोमॅटोला बाजारात चांगला दर मिळाला. यापूर्वीही साहिलने टोमॅटोची यशस्वी लागवड करून चांगले उत्पन्न घेतले होते.tomatoes grown मात्र यंदा त्याने दीड एकर क्षेत्रात अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करून उत्पादनात लक्षणीय वाढ केली. स्थानिक भाजीपाला विक्रेते तसेच अडत व्यापार्‍यांकडून त्याच्या टोमॅटोला मोठी मागणी असून, गुणवत्तेबाबतही विशेष प्रशंसा होत आहे.
शेतकरी घेत आहेत सल्ला
साहिलच्या या यशामुळे अचलपूर तालुक्यातील अनेक शेतकरी त्याच्याकडे शेतीविषयक मार्गदर्शनासाठी येत आहेत. विशेषतः युवकांमध्ये शेतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असून, आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा त्यांना मिळत आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घ्यावे, खर्च कसा नियंत्रित करावा आणि बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा, याबाबत साहिल इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहे. तरुण वयात शेतीमध्ये यश मिळवून साहिल क्षिरसागर यांनी मेहनत, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीही समृद्ध भविष्य देऊ शकते, हे दाखवून दिले आहे. त्यांची ही यशोगाथा अनेक शेतकरी व युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
Powered By Sangraha 9.0