32 नोकर्‍यांसाठी वाघ-मानव संघर्षाचा वणवा पेटवता का?

09 Jan 2026 19:05:57
चंद्रपूर,
wildfire चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 50 ग्रामस्थांना वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागतो. वन्यप्राण्यांशी होणार्‍या निष्पाप शेतकर्‍यांचा या संघर्षावर उपाययोजना करण्याऐवजी, येथे लोहारडोंगरी खाणीला परवानगी देऊन हा संघर्ष अधिक तीव्र केला जात आहे. केवळ 32 कायमस्वरूपी नोकर्‍यांचे गाजर दाखवून 18 हजार झाडे तोडणे आणि वाघांचे भ्रमणमार्ग बंद करणे म्हणजेच गावकर्‍यांना मृत्युच्या दाढेत लोटणे होय, अशी घणाघाती टीका इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे माजी सदस्य बंडू धोतरे यांनी केली आणि या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.
 

wagh manav 
 
 
ताडोबा ते लोहारडोंगरी वनक्षेत्रातून वाघांचे उत्तरेकडे आणि पूर्वेकडे होणारे नैसर्गिक स्थलांतर थांबल्यास, ताडोबा आणि ब्रह्मपुरीतील वाघांच्या नैसर्गिक स्थलांतरावर नक्की परिणाम होईल. त्यामुळे आधीच गंभीर असलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष हाताबाहेर जाईल. वनविभाग कडून संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न आणि राज्याकडून देण्यात येणारी संघर्ष भरपाईची रक्कम खाणीच्या प्रस्तावित फायद्यांपेक्षा जास्त असल्याचे अहवालात नमूद आहे. लोह खनिजाच्या खाणकामामुळे निसर्ग, जंगल आणि जलस्त्रोत तर नष्ट होतीलच, पण उडणार्‍या धुळीमुळे शेतीचीही राखरांगोळी होईल. त्रिसदस्यीय समितीने स्पष्टपणे हा प्रकल्प नाकारला आहे. तरीही तो राबवला जात आहे.
या प्रकल्पात केवळ 120 लोकांना स्थानिक रोजगार मिळणार असून, त्यात फक्त 32 पदे कायमस्वरूपी आहेत.wildfire एवढ्या कमी फायद्यासाठी अत्यंत महत्वाच्या वनक्षेत्रात, वाघाच्या भ्रमणमार्गात, उच्च दर्जाच्या व्याघ्र अधिवासातील 18,024 पूर्ण वाढलेली झाडे तोडणे पर्यावरणादृष्ट्या आत्मघातकी आहे, असे इको-प्रो संस्थेचे म्हणणे आहे. इको-प्रो संस्था याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही धोतरे यांनी दिला आहे.
खाणीला माझे समर्थनः आ. विजय वडेट्टीवार
ही खाण माझ्या मतदार संघात येते. जिथे खाण होणार आहे तो भाग ताडोबा प्रकल्पाच्या ‘कोअर किंवा बफर’मध्ये मोडत नाही. राहता राहिला वाघांच्या भ्रमणमार्गाचा प्रश्न, तर वाघ मार्ग बदलत असतात. शिवाय या प्रश्नावर उत्तर शोधले जाऊ शकते. तसेही आम्हीच आजवर जंगल जपत आलो आहोत. त्यामुळे रोजगार निर्मिती होत असेल, तर या प्रकल्पाला माझा अजिबात विरोध नाही, असे मत आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0