अत्यंत अभिमानास्पद क्षण!

ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत मराठी ‘दशावतार’

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Dashavatar Oscar selection, २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून नाव कमावलेल्या ‘दशावतार’ने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचा मान उंचावला आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या ‘दशावतार’ची ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली असून, जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवड झालेल्या १५० चित्रपटांत स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे.
 

Dashavatar Oscar selection, 
कोकणातील सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन आणि सामाजिक आशय यांचे संवेदनशील दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली बाबुली मिस्त्रीची भूमिका विशेष गाजली असून, त्यांच्या अभिनयाचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. प्रभावळकरांच्या या भूमिकेमुळे केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
 
 
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरून ऑस्कर निवडीची माहिती देत चाहत्यांशी हा आनंदाचा क्षण शेअर केला. या यशानंतर चित्रपटावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे. ‘हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारी आणि दिलीप प्रभावळकरजींनी अत्यंत मनापासून साकारलेली भूमिका असलेला हा चित्रपट जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे,’ असे त्यांनी नमूद केले. तसेच दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
 
 
व्यावसायिक यशाच्या dashavatar-oscar-selection बाबतीतही ‘दशावतार’ने नवा मापदंड निर्माण केला आहे. अवघ्या ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आपले बजेट वसूल केले. भारतात २३ कोटींहून अधिक तर जागतिक स्तरावर २८ कोटींहून अधिक कमाई करत हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.
आशयघन कथा, सशक्त दिग्दर्शन आणि प्रभावी अभिनय यांच्या जोरावर ‘दशावतार’ने मराठी सिनेमाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ऑस्करच्या व्यासपीठावर या चित्रपटाची वाटचाल मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवी दारे उघडणारी ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे.