तभा वृत्तसेवा
पुसद,
Digambar Jagtap, पक्ष, झेंडा कुठलाही असला तरी समाजाच्या हितासाठी व समाजाने दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी निवडून आलेल्या मराठा समाजातील नगरसेवकांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण असे गणित ठेवून राजकारणाचा समाजकारणासाठी सदुपयोग करावा, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दिगंबर जगताप यांनी केले.
ते पुसद येथील मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा समाजातील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजू देशमुख, शरद मैंद, अनिरुद्ध चोंढीकर, अॅड. रमेश पाटील, क्रांती कामारकर, सुधीर देशमुख, शुभांगी पानपट्टे, वर्षा पाटील उपस्थित होते.
नवनिर्वाचित सदस्य अॅड. भारत जाधव, दीपक काळे, अभिजीत पानपट्टे, राजू सोळंके, शिल्पा देशमुख, दीपाली जाधव व ऐश्वर्या बोरकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. रमेश पाटिल यांनी पुसद शहरातील समस्यांचा उहापोह करुन निवडुण आलेल्या सदस्यांनी त्या सोडवून जनतेचे मन जिंकण्याचे काम करावे, असे मत आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. अॅड. भारत जाधव यांनी जनतेने व समाजाने दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे सांगून विकासाच्या कामासाठी सहकार्य करण्याची भूमिका विषद केली.कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन जाधव यांनी, तर आभार सेवासंघाचे तालुकाध्यक्ष गोविंद कदम यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थीती होती. तर शरद मैंद यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन नवीन ताकदीने व जोमाने जनतेची सेवा करावी व पुन्हा निवडून येण्यासाठी आपले स्थान बळकट करावे, असे मत व्यक्त केले.