नागपूर,
Eye care services, माधव नेत्रालयातर्फे डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचारासोबतच संशोधनालाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासोबतच ग्रामीण व आदिवासी भागातील गरजवंत रुग्णांच्या घरापर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी ‘आय केअर फॉर डोअर’ ही संकल्पना राबवावी, असे प्रतिपादन केरळच्या वायनाड येथील स्वामी विवेकानंद मिशनचे मुख्य पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव यांनी केले.
वासुदेवनगरातील माधव नेत्रालय व अनुसंधान केंद्राच्या संकल्प सिद्धी परिसरात आयोजित ‘नेत्रांजली’ विशेषांकाचे प्रकाशन डॉ. धनंजय सगदेव यांच्या हस्ते झाले. रा.स्व. संघाचे प्रचारक रवींद्र भुसारी, माधव नेत्रालयाचे प्रबंध संचालक मेजर जनरल (निवृत्त) डॉ. अनिल बाम, अनिल शर्मा, वंदना वर्णेकर, संदीप धर्माधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.माधव नेत्रालयाच्या सेवाभावी उपक्रमांबद्दल बोलताना डॉ. धनंजय सगदेव म्हणाले, मध्य भारतातील नेत्र रुग्णांच्या उपचारासोबत संशोधनासाठी माधव नेत्रालयाने पुढाकार घेतला आहे. ‘आय केअर फॉर डोअर’ ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यासाठी ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम, अतिदुर्गम भागात ‘मोबाईल केअर यूनिट’ सुरू करावे, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
वायनाड येथील आरोग्य, शिक्षणासह विविध सुविधा प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविक अनिल शर्मा यांनी केले. डॉ. हितेश यादव, नेहा मिश्रा, सिद्धी केंद्राचे संचालक सुधाकर गोखले, शिरिष दारव्हेकर, वृंदा पितळे, श्रेयांस कामदार, राजेश मिश्रा, राजेंद्र जैन, गजानन पाटील, श्रद्धा बडकस, जिज्ञासा कुबडे, कमल किशोर सारडा, मनिष केसरवानी, विजय शिलेदार व रश्मी कानगो उपस्थित होते.
पत्रकारांचा सन्मान
दै. तरुण भारतचे ज्येष्ठ वार्ताहर किरण राजदेरकर यांच्यासह सुमेध वाघमारे, संजय गांजरेे, चंद्रकात चावरे, महेेश बोकडे, अनिकेत शास्त्री, रजत वसिष्ठ, अमर काणे, सर्फराज अहमद, अनिकेत उमप, गजानन उमाठे, रोहित खोडे आदींचा गौरव करण्यात आला.