cyber fraud स्मार्टफोनवर येणारी लग्नाची आमंत्रणे आता आनंदाचा नव्हे, तर सायबर फसवणुकीचा धोका ठरत आहेत. अँड्रॉइड ॲप्लिकेशन फाइल्स (एपीके)च्या स्वरूपात पाठवली जाणारी बनावट लग्नाचे निमंत्रण पत्र वापरून सायबर गुन्हेगार नागरिकांची हेरगिरी, आर्थिक चोरी आणि फोन लॉक करण्यापर्यंत मजल मारत असल्याचे प्रकार नागपूरमध्ये वाढत आहेत.
सायबर तज्ञांच्या माहितीनुसार, ही आमंत्रणे प्रतिमा, व्हिडिओ किंवा पीडीएफ स्वरूपात नसून थेट ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास प्रवृत्त करतात. वेडिंगकार्ड.एपीके किंवा शादी_आमंत्रण.एपिके अशा नावांनी येणाऱ्या या फाइल्स वापरकर्त्यांना ‘अज्ञात स्रोतां’मधून इन्स्टॉलेशनची परवानगी देण्यास भाग पाडतात. एकदा एपिके इन्स्टॉल झाले की, फोनची सुरक्षा यंत्रणा बायपास होते आणि मालवेअर डिव्हाइसवर गुपचूप नियंत्रण मिळवते.
पीडितांनी फोनचा वेग कमी होणे, डेटा झपाट्याने संपणे, तसेच बँक खात्यातून अनधिकृत पैसे काढले जाण्याच्या तक्रारी केल्या आहेत. हे मालवेअर संदेश, संपर्क, कॉल लॉग, स्टोरेज आणि विशेषतः ‘ॲक्सेसिबिलिटी’ परवानगी मिळवते. याच परवानगीमुळे फसवणूक करणाऱ्यांना स्क्रीनवरील हालचाली पाहणे, यूपीआय व बँकिंग व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करणे शक्य होते. काही प्रकरणांमध्ये पुढील टप्प्यात फोन लॉक करून किंवा डेटा एन्क्रिप्ट करून खंडणीची मागणीही केली जाते.