तिवसा महावितरण कार्यालयात शेतकर्‍यांचा ठिय्या

09 Jan 2026 21:35:50
तिवसा,
tivsa mahavitaran office वरखेड मंडळातील शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तिवसा येथील महावितरण उपविभागीय अभियंता कार्यालयात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांना आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्यात येत असून, सध्या परिसरात बिबट व इतर हिंस्र प्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता रात्रीचे ओलित करणे जीवघेणे ठरत आहे.
 

vij purvtha 
 
 
अलीकडेच उंबरखेड शेतशिवारात बिबट्याने म्हशीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दहशतीमुळे शेतकर्‍यांनी रात्री शेतात जाणे जवळपास बंद केले असून, परिणामी ओलिताची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना, आता रब्बी पिकांवरच शेतकर्‍यांची संपूर्ण उपजीविका अवलंबून आहे. या रब्बी पिकांसाठी शेतकर्‍यांनी तन-मन-धन ओतले असून, ही पिके पूर्णतः विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नियमित व दिवसा वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. मात्र, सततचा वीज लपंडाव आणि रात्री येणारी वीज यामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाला आहे. या संदर्भात शेतकर्‍यांनी यापूर्वी अनेकवेळा विद्युत वितरण कंपनीकडे तसेच तालुका उपअभियंत्यांकडे लेखी निवेदने देऊन दिवसा वीजपुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने अखेर संतप्त शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष उपकार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यावेळी काही दिवसांतच प्रायोगिक तत्त्वावर वरखेड, निंभोरा, चांदुर ढोरे यासह एकूण नऊ गावांमध्ये दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल, असे ठोस आश्वासन देण्यात आले.tivsa mahavitaran office या आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी आपले ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, चार ते सहा दिवसांत दिवसा वीजपुरवठा सुरू न झाल्यास अमरावती येथील मुख्य अभियंता यांच्या दालनासमोर शेकडो शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी उपअभियंता विखे यांना दिला आहे. या आंदोलनात भैय्यासाहेब बोके, दिनेश वानखडे, विलास हांडे, सतीश बोके, अतुल कळंबे, शरद अग्रवाल, सुरेंद्र भगत, सुनील गोरडे, उत्तम बरखडे, स्वप्निल मनोहर यांच्यासह वरखेड मंडळातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0