विश्वासच बसत नाही पण माेबाईल परत मिळाला

09 Jan 2026 15:15:20
अनिल कांबळे
नागपूर,
mobile phone माेबाईल हरवला किंवा चाेरी गेला तर ताे परत मिळणे खूपच कठिण काम असते. त्यामुळे एकदा का माेबाईल हरवला गेला तर ताे परत मिळेल, ही आशासुद्धा नागरिक साेडून देतात. औपचारिकता म्हणून नागरिक पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवतात आणि पुन्हा पाेलिस ठाण्याकडे वळूनही बघत नाहीत. मात्र, आपला हरवलेला माेबाईल पुन्हा मिळेल ही आशा साेडून दिलेल्या 53 नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. कपिलनगर पाेलिसांनी तांत्रिक काैशल्याचा वापर करून शाेधून काढलेले 53 माेबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केले. पाेलिस उपायुक्त डाॅ.संदीप पखाले (परिमंडळ 6) आणि ठाणेदार सतीश आडे यांच्या हस्ते या माेबाईलचे वाटप करण्यात आले.
 

मोबाइल  
 
महाराष्ट्र पाेलिस ‘रायझिंग डे’ (पाेलिस वर्धापन दिन) सप्ताहाचे औचित्य साधून कपिलनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी हा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. विविध कंपन्यांचे एकूण 53 माेबाईल, ज्यांची अंदाजे 9 लाख 50 हजार रुपये आहे, ते शाेधून काढण्यात पाेलिसांना यश आले.mobile phone कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांनी हरवलेल्या माेबाईलच्या अर्जाचा गांभीर्याने तपास केला. तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून आणि विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन हे 53 माेबाईल हस्तगत करण्यात आले. पाेलिस उपायुक्त डाॅ.संदीप पखाले यांनी पाेलिसांच्या काैशल्याचे काैतुक केले आणि नागरिकांना त्यांचे संच सुपूर्द केले.
चेहऱ्यावरील स्मित हास्यातच समाधान
माेबाईल हरविल्याची तक्रार देऊन अनेक जण निघून जातात. त्यांना माेबाईल परत मिळेल अशी आशासुद्धा नसते. मात्र, आम्ही सुप्तपणे आमचे काम-तपास करीत असताे. माेबाईल परत दिल्यानंतर तक्रारदारांच्या चेहऱ्यांवरील जे स्मित हास्य आहे, त्यातच आम्हाला समाधान आहे.
- सतीश आडे (ठाणेदार, कपीलनगर पाेलिस स्टेशन)
Powered By Sangraha 9.0