इराणमध्ये इंटरनेट बंद, रस्त्यांवर गोळीबार; अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा

09 Jan 2026 09:27:27
तेहरान,
Internet shut down in Iran इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या राजवटीविरोधात असंतोषाची लाट तीव्र होत असून देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने उसळली आहेत. इराणचे निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी दिलेल्या आवाहनानंतर हजारो नागरिक घराबाहेर पडले असून तेहरानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये घोषणाबाजी, जाळपोळ आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून इराण सरकारने इंटरनेट सेवा बंद केली असून अनेक ठिकाणी लँडलाइन आणि मोबाईल कॉल्सही खंडित करण्यात आल्या आहेत. टेलिग्रामसारखी माध्यमेही ऑफलाइन करण्यात आली असून, त्यामुळे देशातील संपर्क यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे.
 
 
 
trump and iran
इराणमधील पन्नासहून अधिक शहरांमध्ये निदर्शनांचे दृश्य पाहायला मिळत असून छतांवरून आणि रस्त्यांवरून सरकारविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. आतापर्यंत या आंदोलनात किमान ४१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून २,००० हून अधिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घडामोडींमुळे इराण सरकारवर आणि सर्वोच्च नेते खमेनी यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान, रेझा पहलवी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना भीती न बाळगता आवाज उठवण्याचे आवाहन केल्याने आंदोलनाला अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आणि कडक इशारा दिला आहे. एका रेडिओ मुलाखतीदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणी सरकारने जर निदर्शकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा मार्ग स्वीकारला, तर अमेरिका मोठी आणि कठोर कारवाई करेल. इराणमध्ये यापूर्वीही दडपशाही करण्यात आल्याचा उल्लेख करत ट्रम्प यांनी, “जर त्यांनी पुन्हा लोकांना मारण्यास सुरुवात केली, तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,” असा इशारा दिला आहे.
 
दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही इराणमधील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्या इराणी नागरिकांच्या पाठीशी अमेरिका उभी असल्याचे त्यांनी सांगितले. इराणी राजवट गंभीर संकटांचा सामना करत असून, अमेरिकेशी त्यांच्या अणुकार्यक्रमाबाबत प्रामाणिक चर्चा करणे हाच त्यांच्यासाठी योग्य मार्ग असल्याचेही व्हान्स यांनी स्पष्ट केले. इराणी जनतेसह जगभरात हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व लोकांच्या बाजूने अमेरिका उभी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
Powered By Sangraha 9.0