नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपाची कडक कारवाई; ३२ कार्यकर्त्यांचे निलंबन

09 Jan 2026 16:08:47
नागपूर, 
nagpur-municipal-corporation-elections नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संघटनात्मक शिस्त न पाळल्याचा आणि पक्षविरोधी हालचाली केल्याचा ठपका ठेवत भाजपाने तब्बल ३२ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.
 
nagpur-municipal-corporation-elections
 
तिवारी यांनी सांगितले की, निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपमधील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यापैकी ९६ जणांनी समजूत काढल्यानंतर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अर्ज कायम ठेवले आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर सहा वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या ३२ जणांमध्ये काही माजी नगरसेवक तसेच सध्या निवडणूक लढवत असलेले उमेदवारही आहेत, जे थेट भाजपालाच आव्हान देत आहेत. nagpur-municipal-corporation-elections यामध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल आणि सुनीता महल्ले यांचाही समावेश आहे.
भाजपा शहराध्यक्षांनी स्पष्ट केलं की, पक्षासाठी संघटनात्मक शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचा निर्णय अंतिम असतो आणि अधिकृत उमेदवाराच्या समर्थनात काम न करणाऱ्या किंवा पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान नाही. त्यामुळेच पक्षनिष्ठा आणि शिस्त या तत्त्वांना सर्वोच्च प्राधान्य देत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निलंबित कार्यकर्त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, तिकीट वाटपाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अंधारात ठेवण्यात आले. उमेदवारी का नाकारली गेली याचे स्पष्ट कारण सांगितले गेले नाही. nagpur-municipal-corporation-elections मात्र स्थानिक जनतेने निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याने, निलंबनाबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0