दिल्लीसह उत्तर भारत थंडीच्या विळखा; दक्षिणेकडे पावसाचा कहर

09 Jan 2026 09:39:40
नवी दिल्ली,
North India winter chill उत्तर भारतात थंडीचा कडाका आणखी तीव्र झाला असून अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली-एनसीआर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार थंड वारे वाहत असल्याने तापमानात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी राजधानीसह एनसीआरच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आधीच बोचऱ्या थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. हवामान खात्याने दाट धुक्याचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला असून किमान तापमान सुमारे ६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान १७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी गुरुवारी दिल्लीत किमान तापमान ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.
 
 
 
rain india and cold 
 

उत्तर प्रदेशातही थंडीचा प्रभाव कायम असून अनेक भागांत थंड वाऱ्यांमुळे गारठा जाणवत आहे. दिवसा काही ठिकाणी सूर्यप्रकाश मिळत असला तरी तो फारसा दिलासा देणारा ठरत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सध्या थंडी किंवा दाट धुक्याबाबत कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसला, तरी थंडीपासून सुटका झालेली नाही. पुढील आठवड्यापासून राज्यात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

डोंगराळ भागात परिस्थिती अधिक गंभीर असून उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील चार ते पाच दिवस दाट ते अतिदाट धुक्याचे सावट राहणार आहे. या काळात थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीमुळे लोक दिवसा देखील घराबाहेर पडणे टाळत आहेत. काश्मीर खोऱ्यात तर अनेक भागांमध्ये तापमान शून्याच्या खाली गेले असून ठिकठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कीकडे उत्तर भारत गारठ्यात अडकलेला असताना, दुसरीकडे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या खोल दाबाच्या पट्ट्यामुळे ९ आणि १० जानेवारीदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये पिवळा आणि नारिंगी अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Powered By Sangraha 9.0