मेडिगड्डा प्रकल्पावरील गेट उघडा

09 Jan 2026 17:36:15
सिरोंचा,
medigadda project सिरोंचा तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या मेडिगड्डा प्रकल्पावरील बंद गेट उघडण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला असून, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी या प्रश्‍नावर थेट आमदार दरबारात धडक दिली आहे. सिरोंचा तालुक्याच्या दौर्‍यावर असलेले आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेऊन त्यांनी सविस्तर निवेदन सादर करत गेट उघडण्याची तातडीची मागणी केली.
 

medigadda project 
 
 
या भेटीत मेडिगड्डा प्रकल्पावरील गेट गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना भोगावे लागत असलेले गंभीर परिणाम श्रीकांत सुगरवार यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः आरोग्य सेवा, दैनंदिन रोजगार, व्यवसाय तसेच सामाजिक संबंधांवर या बंदीचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवेदनावर चर्चा होताच आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या प्रश्‍नाची दखल घेत सिरोंचाचे पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधला आणि या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपयोजना करण्याचे निर्देश दिले. आमदारांनी प्रशासनाकडून समन्वय साधून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा सकारात्मक शब्द दिल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सिरोंचा तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक आरोग्य उपचारांसाठी तसेच अन्य आवश्यक कामांसाठी तेलंगणा राज्यात नियमित ये-जा करतात. दोन्ही राज्यांमध्ये ‘रोटी-बेटी व्यवहार’ असल्याने सामाजिक नातेसंबंधही घट्ट आहेत. शिवाय अनेक मजूर रोजंदारीच्या रोजगारासाठी दररोज सीमापार प्रवास करतात.medigadda project मात्र मेडिगड्डा प्रकल्पावरील गेट बंद असल्याने या सर्वांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रश्‍नांवर उपाययोजना व्हावी, यासाठी श्रीकांत सुगरवार यांनी केवळ आमदारांकडेच नव्हे तर जिल्हाधिकारी यांच्याकडेही निवेदन सादर केले असून, प्रशासनाच्या विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हा प्रश्‍न केवळ वाहतुकीचा नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जगण्याचा आहे, असे स्पष्ट मत सुगरवार यांनी व्यक्त केले आहे.
मेडिगड्डा प्रकल्पावरील गेट अखेर उघडणार की नाही, याकडे आता संपूर्ण सिरोंचा तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीवर नेमका काय निर्णय घेतात, यावर तालुक्यातील जनजीवनाची दिशा ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0