वाशीम,
child rights protection जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, वाशीम तसेच बेटी बचाव-बेटी पढाओ या योजनेअंतर्गत बालकल्याण क्षेत्रात कार्यरत ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, विशेष बाल पोलीस पथक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तालुकास्तरीय प्रशिक्षण ८ जानेवारी रोजी पंचायत समिती, मानोरा येथे संपन्न झाले. बालहक्क संरक्षण, बालविवाह प्रतिबंध,बालकांवरील अत्याचार रोखणे तसेच विविध बाल संरक्षण कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणा अधिक सक्षम करणे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी अनुप कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, गट शिक्षण अधिकारी पवार, पोलिस उपनिरीक्षक भारत रामटेके, परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे, शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सावके, तालुका विधी सेवा प्राधिकरण, मानोरा येथील अॅड. पी. जे. अग्रवाल व अॅड. एल. एस. रेखाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी तसेच नीती आयोगाच्या प्रकल्प सहयोगी नीलिमा भोंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोसो ऍट) बाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, बालकांचे लैंगिक शोषण ही गंभीर सामाजिक समस्या असून, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामस्तरावरील कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी या कायद्याची सखोल माहिती ठेवून तक्रारी वेळेत नोंदवाव्यात तसेच बालकांशी संवेदनशीलतेने वागावे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी अनुप कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पोसो अधिनियम २०१२ हा केवळ शिक्षा देणारा कायदा नसून बालकांचे संरक्षण, पुनर्वसन व सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. अशा प्रशिक्षणांमुळे विविध विभागांमधील समन्वय वाढतो व क्षेत्रीय कर्मचार्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट होते, असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच गट शिक्षण अधिकारी पवार व पोलिस उपनिरीक्षक भारत रामटेके यांनीही प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आपले विचार मांडले.
प्रशिक्षणासाठी उपस्थित तज्ज्ञ मार्गदर्शक अॅड. पी. जे. अग्रवाल व जिनसाजी चौधरी यांनी पोसो अधिनियम - २०१२ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. एल. एस. रेखाते यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध विषयावर माहिती दिली, तर नीलिमा भोंगाडे यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२००६ विषयी सखोल मार्गदर्शन केले.child rights protection यावेळी गणेश ठाकरे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली, तर अश्विनी बर्डे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या सेवांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बालविवाह, लैंगिक अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या सामाजिक समस्यांची लवकर ओळख, तात्काळ कार्यवाही, योग्य संदर्भ सेवा व कायदेशीर प्रक्रियेची अचूक अंमलबजावणी अपेक्षित असून, बालकांसाठी सुरक्षित व संरक्षणात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रशिक्षणाच्या शेवटी उपस्थित सर्वांना बालविवाह निर्मूलनाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ता अनंता इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर वाळले, चाइल्ड हेल्पलाईन पर्यवेक्षक अमोल देशपांडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले.