‘ठाकरे ब्रॅण्ड’चा बँड वाजणार

09 Jan 2026 06:00:00
मोरेश्वर बडगे
thackeray brand राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकीला आता अवघे सहा दिवस उरले आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल. 16 जानेवारीला मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल हाती येतील. प्रचाराला राजकीय पक्षांकडे आता मोजके चार दिवस उरले आहेत. पण अजून निवडणूक ज्वर म्हणावा तसा तापलाच नाही. कसा तापणार? प्रबळ विरोधी पक्षच आखाड्यात दिसत नाही. कसा दिसणार? विरोधी पक्षांची लढायची इच्छाशक्तीच संपली आहे. निवडणुका लढायच्या म्हणून लढायच्या आणि हरायचे, असा मामला आहे. महिन्यापूर्वी झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुका महायुतीने जिंकल्या. विरोधकांचा सुपडासाफ झाला. तसलेच वातावरण पुन्हा पाहायला मिळत आहे. ही तसलीच निवडणूक आहे. ‘युद्ध’ पुन्हा खेळले जात आहे. तुम्ही पहा. सगळ्या जागी भाजपा आणि त्यांची महायुती मजबुतीने उभी दिसत आहे. निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. देवाभाऊंचा चेहरा पुढे करून भाजपा लढते आहे. जोडीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ‘बोनस’ आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे थोडीफार चुरस दिसते. तेथे महायुतीतील मित्रपक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाशी लढतो आहे. कुठूनही निवडून या, निकालानंतर महायुतीतच यायचे असल्याने टेन्शन नाही. कोकणातल्या कणकवली नगर परिषद निवडणुकीत नितेश आणि नीलेश या दोन राणे बंधूंमध्ये तुंबळ युद्ध झाले. मात्र, निकालानंतर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे उदाहरण ताजे आहे. मुंबईत काट्याची टक्कर आहे. गेली 30 वर्षे मुंबई महापालिका ठाकरे कुटुंबाच्या हातात राहिली. यंदा त्यांना प्रथमच भाजपाचे कडवे आव्हान आहे.
 
 
देवेंद्र
 
 
उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या चुलत भावाला म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेतले आहे. भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तर ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काय होणार यापेक्षा सध्या काय सुरू आहे? 16 तारखेचा निकाल कसा असेल? याचे ट्रेलर आताच पाहायला मिळाले. राज्यात महायुतीचे 68 नगरसेवक महापालिकेवर बिनविरोध निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने हा चमत्कार घडला. मुंबईत एकूण 227 जागा आहेत. त्यातल्या किमान 150 जागा जिंकून महायुती धमाल करणार आहे. उमेदवार कोण? हा मुद्दा गौण आहे. लोकसभेत ‘मोदी’ उमदेवार होते. इथे सगळ्या जागी ‘देवाभाऊ’ उभे आहेत. इथे पक्षांमध्ये फाईट नाही. सामान्य मतदार ‘देवाभाऊ’साठी मतदान केंद्रांवर रांगा लावणार आहेत. तुम्ही लिहून ठेवा. गाजावाजा झालेल्या ‘ठाकरे ब्रँड’चा बँड वाजणार आहे.
ठाकरे बंधूंनी काढलेला ‘सत्याचा मोर्चा’ तुम्हाला आठवत असेल. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. दुबार मतदार आहेत, आधी याद्या शुद्ध करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी करत ठाकरे बंधूंनी हा मोर्चा काढला होता. मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, अशी धमकी राज ठाकरे यांनी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी तर कोर्टात जाण्याची भाषा केली होती. मात्र प्रत्यक्षात काय झाले? महापालिका निवडणुका जाहीर होताच सारे गुपचूप कामाला लागले. याचा अर्थ त्यांच्या आरोपांमध्ये दम नव्हता. प्रत्येक निवडणुकीत अशाच याद्या तयार होत आल्या. आताही तशाच झाल्या. मात्र कसेही करून आपल्या संभाव्य पराभवाची कारणं तयार ठेवायची ही विरोधकांची जुनी खोड आहे. विरोधकांकडे आहे काय? ‘ठाकरे ब्रँड’ नावाने त्यांनी फुगवलेला पत्त्यांचा बंगला कोसळतो आहे. बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तोपर्यंत ठाकरे हा मुंबईत ब्रँड होता. भाजपाला हरवायला निघाले आहेत हे. पण तयारी काय? ठाकरे बंधूंची कुठलीही तयारी नाही. फक्त तोंडाच्या वाफा दवडणे सुरू आहे. आता महायुतीचे 68 उमेदवार अविरोध निवडून आले. कारण त्यांच्याविरोधात उभ्या उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. निवडणूक म्हटले की सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते. आपली माणसं माघार घेणार नाहीत याची काळजी कोणी घ्यायची असते? नेते झोपून राहिले आणि आता ओरडा करत आहेत. ‘लोकशाहीची हत्या झाली, पैसाच खेळ झाला,’ ‘नोटा’चा अधिकार हिरावून घेतला जातोय’ असे म्हणून छाती बडवणे सुरू आहे. पण माघार घेणाऱ्या एकाही उमेदवाराने तशी तक्रार केलेली नाही. त्यांच्यात ताकद नव्हती, त्यांना ताकद देणारे नेतृत्व नव्हते. त्यामुळे ते बाजूला झाले. जिथे विरोधी नेत्यांमध्ये ताकद होती तिथे हे प्रकार घडले नाहीत. राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे कुठेही उमेदवार पळवणारी टोळी आलेली नाही. तुम्हाला तुमचे उमेदवार सांभाळता आले नाहीत हे का लपवता? या आधी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले गेले, बोगस मतदारांमुळे आम्ही हरलो, असे विरोधक म्हणायचे. आता त्यांना पुढच्या पराभवासाठी हे नवं कारण मिळालं आहे. पण हे प्रथमच घडलं अशातला भाग नाही. अनेक दशकांपासून हे सुरू आहे. 2018 मध्ये पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 20 हजार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या घटनेची सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली होती. त्यामुळे आपल्याकडे काही नवं घडलं असे समजायचे कारण नाही. याकडे बोट दाखवायचं तर मग 2019 मध्ये काय घडलं होतं? जनतेने भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूने बहुमताचा कौल दिला असताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची हौस भागवली. त्यावेळी लोकशाहीची हत्या झाली नव्हती का? जनतेने भाजपासोबत बसायला सांगितले असताना महाविकास आघाडीसोबत बसणारे उद्धव ‘गद्दार’ होत नाहीत का?
राज्यात 29 महापालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मात्र त्यातल्या सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे. राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक हरले तर ठाकरे बंधू संपले. ठाकरे बंधूंनी मराठी आणि महाराष्ट्राचे हित हा या निमित्ताने अस्मितेचा मुद्दा बनवला आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो असे राज ठाकरे म्हणत आहेत. पण तसे आहे तर मग 20 वर्षे महाराष्ट्र तुडवण्यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले होते का? 14 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 29 टक्के तर शिंदे सेनेला 17 टक्के मतं मिळाली होती. ठाकरे सेना 23 टक्क्यावर थांबली होती.thackeray brand दोघांमध्ये 16 टक्क्यांचा फरक आहे. या 16 टक्क्यासाठी आता संघर्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार हे आताच स्पष्ट आहे. ठाकरे ब्रँड म्हणजे कडवट हिंदुत्व. तेच त्यांनी सोडले, त्यामुळे ठाकरे ब्रँडचे ग्लॅमर हरपले आहे. उद्धव ठाकरेंनी कट्टर हिंदुत्वाची ठेव गमावली आहे. त्यांनी मुस्लिमांना जवळ केले. त्याच फटका त्यांना बसणार. ठाकरे स्वतःची नवी व्होट बँक निर्माण करू शकले नाहीत. राज ठाकरे त्यांना फार मदतीचे ठरणार नाहीत. ‘ममू’ म्हणजे मराठी माणूस आणि मुस्लिम मतं हा फॅक्टर यावेळी महत्त्वाचा ठरणार आहे. ठाकरेंची मराठी मतं शिंदेंचे उमेदवार खातील. लोकांना भावनिक करून निवडणुका जिंकायच्या, निवडणूक आली की मुंबई तोडायला निघाले म्हणून बोंब ठोकायची हा उद्धव यांचा नेहमीच खाक्या राहिला आहे. तब्बल 25 वर्षे ठाकरेंची सत्ता होती. मग मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला, याचे काय उत्तर आहे ठाकरेंकडे? मराठी माणूस आता शहाणा झाला आहे. भाजपाने उभी केलेली विकासाची कामं त्याला खुणावत आहेत.
(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत. )
Powered By Sangraha 9.0