ऐझॉल,
The player died during the match क्रिकेट मैदानावर पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील माजी खेळाडूचा सामन्यादरम्यान अचानक मृत्यू झाला आहे. मिझोरामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेले लालरेमरुआता ८ जानेवारी रोजी स्थानिक क्रिकेट सामना सुरू असतानाच मैदानात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांचे निधन झाले. या घटनेने मिझोराममधील संपूर्ण क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे. वेंघनुई रेडर्स सीसी आणि चोनपुई इल्मोव्ह सीसी यांच्यात सुरू असलेल्या खालिद मेमोरियल सेकंड डिव्हिजन स्क्रीनिंग टूर्नामेंट सामन्यात लालरेमरुआता वेंघनुई रेडर्स सीसीकडून खेळत होते. सामन्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि मैदानावरच ते कोसळले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सामना तात्काळ थांबवण्यात आला. खेळाडू, पंच आणि प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

लालरेमरुआता यांच्या अकाली निधनानंतर मिझोराम राज्य क्रिकेट संघटनेने मोठा निर्णय घेत त्यांच्या सन्मानार्थ सर्व नियोजित क्रिकेट सामने रद्द केले आहेत. संघटनेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले असून राज्य क्रिकेटच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत, ३८ वर्षीय लालरेमरुआता यांनी मिझोरामसाठी दोन रणजी ट्रॉफी सामने खेळले होते. २०२२ मध्ये नागालँडविरुद्ध त्यांनी शेवटचा रणजी सामना खेळला होता. याशिवाय त्यांनी सात टी-२० सामनेही खेळले असून त्यात त्यांनी एकूण ८७ धावा केल्या, ज्यात नाबाद ४४ धावांची खेळीही समाविष्ट आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी दोन सामन्यांतील चार डावांत फलंदाजी करत १७ धावा केल्या होत्या.
क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही लालरेमरुआता मिझोराम क्रिकेटपासून दूर गेले नव्हते. मिझोराम क्रिकेट असोसिएशनमध्ये ते सक्रिय होते आणि वरिष्ठ स्पर्धेच्या समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही त्यांनी क्रिकेटसाठी दिलेले योगदान सर्वश्रुत होते. अलीकडच्या काळात खेळादरम्यान खेळाडूंच्या अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुन्हा एकदा खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लालरेमरुआता यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या आठवणी मिझोराम क्रिकेटच्या इतिहासात कायम राहतील.