नवी दिल्ली,
TMC MPs detained by police. कोलकात्यात ईडीकडून झालेल्या छाप्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय वातावरण तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत टीएमसीच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले. या निदर्शनात डेरेक ओ’ब्रायन, शताब्दी रॉय, महुआ मोईत्रा, बापी हलदर, साकेत गोखले, प्रतिमा मंडल, कीर्ती आझाद आणि डॉ. शर्मिला सरकार सहभागी झाले होते. निदर्शनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये पोलिस खासदारांना अडवून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवताना दिसत आहेत. या गोंधळात एक खासदार जमिनीवर पडल्याचेही दृश्य समोर आले असून, पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळते. या कारवाईमुळे टीएमसीने केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये येत्या मार्च–एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना, त्याआधीच राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ईडीच्या छाप्यामुळे बंगालमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आला असून, हे प्रकरण आता थेट कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून, एक ईडीकडून तर दुसरी टीएमसीकडून सादर करण्यात आली आहे. दोन्ही याचिकांवर लवकरच सुनावणी होणार आहे. या प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर महत्त्वाचे पुरावे बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. याला प्रत्युत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशावरून ईडी टीएमसीचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कथित कारवाईविरोधात त्या कोलकात्यात मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः ईडीच्या ताब्यातील फाईल घेऊन का गेल्या, आणि त्या फाईलमध्ये असे नेमके काय होते की त्यामुळे त्या कोलकाता पोलिस आयुक्तांसह प्रतीक जैन यांच्या घरी गेल्या, ती फाईल जप्त केली आणि स्वतःसोबत घेऊन आल्या? याच मुद्द्यावरून ईडीने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली असून, या याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या घडामोडींमुळे बंगालचे राजकारण अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.