आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर प्रदर्शित

२७ नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मुंबई
Adinath Kothare अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून ‘मिरांडा वॉर्निंग’चा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. फार्महाऊसवर घडलेल्या खुनाच्या घटनेचा आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या तपासाचा थरार या चित्रपटातून उलगडणार आहे. आदिनाथने टीझरसोबत, “जिथे सगळ्यात कमी संशय येतो; तिथेच सर्वात जास्त पाणी मुरत असतं…” असे सूचक कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 

Adinath Kothare Announces Miranda Warning Movie, Teaser Released 
आदिनाथ कोठारे सध्या विविध चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. यामी गौतमसोबत तो ‘नयी नवेली’ या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत असून, बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचाही तो भाग आहे. त्याच्या अलीकडील हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातही आदिनाथ चर्चेत राहिला आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ यांचा सुमारे तीन महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर उर्मिलाने इन्स्टाग्रामवरील नावातून ‘कोठारे’ हे आडनाव बदलून ‘कानेटकर’ केले.
‘मिरांडा वॉर्निंग’ची निर्मिती सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मूव्हीज यांनी केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी यापूर्वी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर या नव्या चित्रपटातून त्यांनी वेगळ्या विषयाची निवड केली आहे. रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.
या चित्रपटात आदिनाथ कोठारे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत जान्हवी किल्लेकर, सुरेश विश्वकर्मा, पायल जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, एकनाथ गीते आणि त्रिशा कमलाकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
फार्महाऊसवर खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागतात. या प्रकरणात संशयाची अनेक वळणे, अनपेक्षित धागेदोरे आणि गुंतागुंतीचे प्रश्न समोर येतात. त्यातून पोलिस अधिकारी तर्क आणि पुराव्यांच्या आधारे खऱ्या गुन्हेगारापर्यंत कसा पोहोचतो, याची कथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सस्पेन्स आणि थ्रिलरच्या परंपरेत ‘मिरांडा वॉर्निंग’ वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. टीझरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असून कथेमागील रहस्य उलगडण्यासाठी प्रेक्षकांना २७ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.